दुर्गेश पाठक यांचे वक्तव्य : शिरोडा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
प्रतिनिधी /शिरोडा
शिरोडा मतदार संघात आम आदमी पक्षाकडे लोकांचा वाढत कल लक्षात घेतल्यास येथे राजकीय क्रांती अटळ आहे. गोव्यातील जनतेमध्ये भाजपा सरकारबद्दल प्रचंड असंतोष असून त्याचे पर्यावसान येणाऱया निवडणुकीत दिसून येतील, असे मत आम आदमी पक्षाचे गोवा प्रभारी दुर्गेश पाठक यांनी व्यक्त केले. शिरोडय़ातील आप नेते व माजीमंत्री महादेव नाईक यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.
आम आदमी पक्षाने दिल्लीत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात जे अमुलाग्र बदल घडवून आणले, त्याची पुनरावृत्त गोव्यात दिसून येईल. आपचे पुढारी हे स्वतःला नेते मानीत नाहीत, तर जनतेचे सेवक मानतात. मोहोल्ला क्लिनिक व पॉलिटेक्निकच्या माध्यमातून दिल्लीत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन झाले आहे. या शैक्षणिक बदलामुळे आज अडीच लाख विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व प्रशासन आपल्या दारी हा मॉडेल गोव्यातही राबविला जाणार आहे, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
महादेव नाईक म्हणाले, आप दिल्लीत महिलांसाठी मोफत बसप्रवास, मोफत वीज व पाणी तसेच मोफत आरोग्य व शिक्षण देत आहे. आपचे सरकार आल्यावर गोव्यातही या सुविधा मिळणार आहेत. दहा हजार नोकऱयांच्या घोषणा करुन भाजपाने गोमंतकीय सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. दहा हजार नोकऱया हा केवळ निवडणुकीचा जुमला आहे. आपचे सरकार सत्तेवर आल्यावर बेरोजगारांना तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता, औद्योगिक कायद्यात बदल करुन खासगी क्षेत्रात 80 टक्के नोकऱयांमध्ये स्थानिकांना आरक्षण तसेच रोजगाराभिमुख शिक्षण याला प्राधान्य दिले जाईल. कोरोनाची झळ बसलेले पर्यटनावर अवलंबून असलेले व्यावसायिक तसेच खाण अवलंबितांना पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.
शिरोडा मतदार संघातील मतदारांचा आपकडे कल वाढत असून भाजपा व अन्य पक्षांना समर्थ पर्याय म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते. आपण केलेला विकास शिरोडय़ातील जनता विसरलेली नाही. येथील सुसज्ज इस्पितळामुळे कोरोना काळात संपूर्ण गोव्यातील रुग्णांना फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ भजनी कलाकार आनंद नाईक यांच्याहस्ते फित कापून आपच्या शिरोडा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलो. यावेळी स्थानिक नागरिक दामोदर बोरकर माधव पै, नागू कवळेकर, आपचे समन्वयक वाल्मिकी नाईक व इतर उपस्थित होते.









