प्रतिनिधी/ पणजी
आम आदमी पक्षातर्फे वीज आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. दि. 1 डिसेंबर ते दि. 19 डिसेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. आपने नेहमीच गोमंतकीयांचा विचार केला असून लोकांना हवा असलेला मुद्दा घेऊन आम्ही या आंदोलनाद्वारे पुढे येत आहोत. आम्हाला लोकांचाही प्रतिसाद बऱयापैकी मिळत आहे. अशी माहीती आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
वीज आंदोलनादरम्यान ज्या सभा होणार आहेत, त्या सभांना येताना लोकांनी आपली वीजबिले घेऊन त्या सभेत यावे. प्रत्येक दिवशी चार सभा होणार असून दि.1 डिसेंबर (आज) रोजी पेरोडे ग्राउंड, बाणावली येथे पहिली सभा, दुसरी सभा एमईएस कॉलेज जंक्शन, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या समोर, सांकवाळ येथे होणार आहे. तिसरी सभा करमळी बाजार, करमळी येथे होणार असून चौथी सभा साळगाव येथे ग्रामपंचायतीच्या आवारात होणार असल्याचे म्हांबरे म्हणाले. या सभांमध्ये उपस्थित लोकांमध्ये वीजेच्या मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. असेही म्हांबरे यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे एसएमएस मोहीमही चालविण्यात येणार असून लोकांनी 7504750475 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा ज्यानंतर त्यांना एक एसएमएस पाठविला जाईल, ज्यावर हे तीन प्रश्न असतील. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी पाठवून द्यावीत ज्यांचा समावेश सर्वमत कौलामध्ये केला जाईल आणि या कौलाचा निकाल घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे म्हांबरे यांनी सांगितले.









