भाजपला धडा शिकविण्यासाठी आप सज्ज : सालसेतवर कब्जा मिळविण्यासाठी काम सुरू
प्रतिनिधी /पणजी
‘आप’ने दक्षिण गोव्यात आपल्या कार्याचा जोरदार सपाटा लावला असून संपूर्ण सालसेतवर कब्जा मिळविण्यासाठी या पक्षाने तळागाळात काम सुरू केल्याने दक्षिण गोव्यात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात काँग्रेसला जोरदार हादरे बसण्याचीच शक्यता वाढली आहे.
‘आप’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयांने सांगितले की, संपूर्ण गोव्यातील 8 लाख नागरिकांच्या संपर्कात पक्ष आलेला आहे. पैशांच्या जीवावर निवडणूक लढवू पहाणाऱया भाजपला देखील धडा शिकविण्यास आम्ही तयार आहोत. आपकडे पर्यायी पक्ष म्हणून पहाण्याचा गोव्यातील नागरिकांच्या दृष्टीकोनामुळे भाजप व काँग्रेस पक्षात चलबिचल सुरु झाली आहे, असे ते म्हणाले.
फायदा उठविण्याचे आपचे प्रयत्न
एवढे दिवस साफ दुर्लक्षित झालेल्या ‘आप’कडे राज्यातील नागरिक पर्यायी व्यवस्था म्हणून पाहू लागल्याने निवडणुकीत गोव्यात वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे. ‘आप’ या पक्षाचे नाव देखील न घेणारी मंडळी काँग्रेस आणि भाजपच्या कारभाराला पूर्णतः कंटाळल्याने जनतेमध्ये अचानकपणे ‘आप’ या पक्षाबाबत तिसरा पर्याय म्हणून चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षातील भांडणे काही संपुष्टात येण्याची शक्यता दिसत नसल्याने कार्यकर्ते बाजूला पडू लागले आहेत. या उलट सत्ताधारी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप वाढत असल्याने ‘आप’ने या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी जोरदार काम सुरू केले.
पक्षाचे कार्य वाढविणार
‘आप’ च्या दिल्लीस्थित पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सोमवारी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले की आपने जवळपास 16 मतदारसंघात आपले कार्य वाढविले आहे. दक्षिणेकडील 5 मतदारसंघात पक्षाची स्थिती मजबूत आहे. उत्तर गोव्यातील तीन मतदारसंघात पक्षाची स्थिती मजबूत होत आहे. आज 9500 प्रमुख कार्यकर्ते गोवाभर आहेत. 40 ही मतदारसंघ जिंकून टाकण्याचे काम हे पदाधिकारी करीत आहेत. दररोज प्रत्येक मतदारसंघात 500 जणांना भेटून त्याबाबतचा अहवाल थेट दिल्लीत पाठविला जातो. त्यानुसार पक्षातर्फे नागरिकांना भेट संदेश जातोय.
शिधा वाटपाचे काम सुरु
सध्या कोविड महामारीच्या काळात राज्यातील 50 हजार जणांना शिधा वाटपाचे काम केले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने 6.7 टक्के मते प्राप्त केली होती. लोकसभा निवडणुकीत 3.5 टक्के मिळविली तर अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पक्षाने सुमारे 14 टक्के मते मिळविली. काँग्रेसला धक्के दिले. आता राज्यातील 25 ते 30 मते टक्के प्राप्त करण्याचे उद्दीष्ट पक्षाने ठेवले आहे. येत्या विधानसभेत पक्षाचे नेते प्रवेश करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुणाकडेही युती करणार नाही
दक्षिण गोव्यातील बाणावली, वेळ्ळी, कुडतरी, नावेली या सालसेतमधील मतदारसंघावर आपने सध्या जादा भर दिलेला आहे. ‘पैसा फेको इलेक्शन जितो’ या भाजपच्या धोरणाला आता मतदार धडा शिकवतील. पण आम्हाला पैसा फेको हे धोरण बदलायचे आहे व गोव्यात स्वच्छ राजकारण करायचे आहे, त्यामुळे पक्ष कोणाकडेही युती करू इच्छित नसल्याचे ते म्हणाले.









