प्रत्येक कुटुंबात किमान एक नोकरी : खाजगी 80 टक्के नोकऱया गोमंतकीयांसठी रोजगार मिळेपर्यंत 3 हजार बेरोजगारी भत्ता
प्रतिनिधी /म्हापसा
आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात सत्तेवर आले तर प्रत्येक कुटुंबात एक सरकारी रोजगार मिळेल. खासगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱया गोमंतकीयांसाठी राखीव ठेवण्यासाठी कायदा केला जाईल. रोजगार उपलब्ध होईपर्यंत दरमहा 3 हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. कोरोना व खाणबंदीमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबांना रोजगार मिळेपर्यंत दरमहा 5 हजार रुपये दिले जातील, असे आश्वासन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल मंगळवारी म्हापसा येथे जाहीर केले.
अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पहिल्या गोवा भेटीत विजेसंदर्भात अनेक घोषणांचा पाऊस पाडून धमाल उडवून दिली होती. आता काल मंगळवारी दुसऱया गोवा भेटीत रोजगारासंदर्भात घोषणांचा वर्षाव केल्याने राजकीय क्षेत्रात आणखी रंगत वाढली आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत गोवा निमंत्रक राहुल म्हांब्रे, उपाध्यक्ष महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो, शिसील रॉड्रिगीज, ऍड. सुरेल तिळवे, वाल्मिकी नाईक उपस्थित होते.
गोव्यात चांगल्या सरकारची गरज
भाजपला गोव्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली पण त्यांनी गोवा लुटला. आता हे थांबवावे लागेल. आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत आणि त्यासाठी प्रामाणिक आणि चांगल्या सराकरची गरज आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिल्लीत होत असलेल्या कामाची नक्कल करत आहेत. जर गोव्यातील जनता मतदान करून योग्य सरकार निवडू शकते तर नक्कल करणाऱयांना निवडून का आणावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीत शक्य झाले ते गोव्याही करु
मोफत वीज देण्याच्या आपच्या घोषणेबाबत गोव्याप्रमाणेच दिल्लीतील जनतेनेही उपस्थित केला होता, मात्र 2015 मध्ये आम्ही हे शक्य करून दाखविले. हे पैसे आले कारण आम्ही लूट करणे थांबविले. आम्ही सरकार प्रामाणिकपणे चालविले. भ्रष्टाचार थांबविला. लाचखोरी थांबविली. यामुळे पैशाची बचत झाली आणि प्रत्येकाला वीज मोफत देणे शक्य झाले. गोव्यातही माझे हेच वचन आहे. मी जे सांगतो ते करतो. असे केजरीवाल म्हणाले.
बेरोजगारी मिटविण्यासाठी आपला सत्तेवर आणा
गोव्यातील तरुण अस्वस्थ आणि दुःखी आहेत. तरुणांना रोजगार नाही. पालक त्यांना शिक्षण देतात मात्र पुढे हे युवक बेरोजगार राहतात अशा परिस्थितीत कोरोनाने समस्येत भर घातली आहे. कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱया गेल्या आणि कुटुंबे हालाखिचे जीवन जगत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गोव्यात खाण व्यवसाय बंद आहे. खाणीत काम करणारे बरेच लोक बेरोजगार असून अनेक तरुणांना उदरनिर्वाहासाठी गोवा सोडावा लागत आहे. आपल्याला गोव्यामध्ये नोकरीच्या संधी निर्माण कराव्या लागतील. यासाठी आता गोव्याला एक प्रामाणिक सरकारची गरज आहे. आम्ही संपूर्ण व्यवस्था पारदर्शक बनवू. गोव्यातील प्रत्येक मुलाला गोव्यातील सर्व सरकारी नोकऱयांवर हक्क असेल. तो त्यात अर्ज करेल आणि त्याला पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळेल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.
रोजगार मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता
कुटुंबातील एका युवकाला सरकारी रोजगार देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले तसेच जोपर्यंत त्या तरुणाला रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्याला दरमहा 3 हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. तसेच खासगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱया गोव्यातील तरुणांसाठी राखीव असतील. त्यासाठी खास कायद्याची तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खाणग्रस्त कुटुंबांना 5 हजार रुपये
कोरोनामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा रोजगार पूर्ववत होत नाही तोपर्यंत त्या कुटुंबांना दरमहा 5 हजार रुपये दिले जातील. खाणीवर अवलंबून असणारी कुटुंबेही खाण बंद झाल्यामुळे उपासमारीच्या मार्गावर आहेत. जोपर्यंत खाणी सुरू होत नाहीत आणि त्यांना त्यांची नोकरी परत मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक खाण कुटुंबाला महिन्याला 5 हजार रुपये दिले जातील.
कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणार
तरुणांना कौशल्य देणे आणि त्यांना नोकऱयांसाठी तयार करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही दिल्लीत कौशल्य विद्यापीठ स्थापन केले आहे. गोव्यातही आपचे सरकार सत्तेवर आले तर कौशल्य विद्यापीठ स्थापन करू. ज्या तरुणाला 12 वी नंतर कोणतेही कौशल्य शिकायचे आहे, ते तो शिकू शकतो आणि आपले काम करू शकतो. स्वतःचा उद्योग करून नोकरी देखील देऊ शकतो, असेही केजरीवाल म्हणाले.
नवीन शाळा, रुग्णालये उघडणार
जर आमचे सरकार बनले तर आम्ही अनेक नवीन शाळा आणि रुग्णालये उघडणार आहेत. सेवांचे घराच्या दारी वितरण सुरू होईल. गोव्यात बऱयाच गोष्टी आहेत. आम्ही 4 वर्षापूर्वी दिल्लीत पाणी मोफत देण्यास सुरुवात केली आहे आता आम्ही गोव्यात वीज मोफत देऊ, असे ते म्हणाले.









