जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 10 हजार नोकऱयांचे गाजर
प्रतिनिधी/ पणजी
एका बाजूने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सोबत सेटिंग करतात तर दुसऱया बाजूने त्याच पक्षाचे लोक गोव्यात भाजपविरोधात कार्य करत असल्याचे भासवतात. यावरून आपचा गोव्यातील प्रवेश हे भाजपचेच सेटिंग असल्याचे सिद्ध होत असून ही गोमंतकीयांची शुद्ध फसवणूक आहे, असा दावा गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर आमदार जयेश साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर व दीपक कळंगुटकर उपस्थित होते. गोव्यात विद्यमान सरकारने जे लोकविरोधी कार्य आरंभले आहे आणि या सरकारच्या प्रत्येक निर्णयास ज्या प्रकारे लोक विरोध करत आहेत, ते पाहता येत्या निवडणुकीत गोवा भाजपमुक्त होईल असेच दिसून येत आहे, असे सरदेसाई म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 10 हजार नोकऱयांचे गाजर
10 हजार नोकऱयांचे गाजर दाखवून हे सरकार बेकारांची धडधडीत फसवणूक करत आहे. आधीच सरकारकडे 55 हजार कायम व 5 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दरमहा कर्ज घेतले जात आहे. अशावेळी आणखी 10 हजार नोकऱया देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का? की हा नोकऱया विक्रीचा बाजार मांडला आहे?, असे सवाल सरदेसाई यांनी केले. ही आश्वासने केवळ जिल्हा पंचायत व पालिका निवडणुकांसाठी देण्यात येत असून बेकारांची चालविलेली थट्टा आहे, असे सरदेसाई म्हणाले.
बेरोजगारीला कंटाळून स्थानिकांचा विदेशाकडे कल
गोव्यात बेकारी प्रचंड वाढल्यामुळेच येथील स्थानिक मोठय़ा संख्येने विदेशात जाऊ लागले आहेत. पणजीत आल्तिनोवर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारीच एका कॉन्सुलेटसमोर रोज दिसणाऱया शेकडो लोकांच्या रांगा पाहता हे सिद्ध होत आहे. मात्र त्यांना रोखण्याची धमक या सरकारकडे नाही. गोव्यात आयटी पार्क, मोपा विमानतळ यासारखे महाप्रकल्प आणले जातात, परंतु त्यात किती गोमंतकीयांना नोकऱया दिल्या व भविष्यात येणाऱया प्रकल्पात किती गोमंतकीयांना नोकऱया देणार? असा सवाल सरदेसाई यांनी केला. याउलट गोमंतकीयांना नोकऱयांची आश्वासने देऊन बिगरगोमंतकीयांना नोकऱया विकल्या जात आहेत, याचे पुरावे समोर आले आहेत, यावरून हे सरकार गोमंतकीयांच्या भावनांशी कशा प्रकारे खेळत आहे, ते दिसून येते, असे ते म्हणाले.
अशावेळी गोमंतकीयांनी भाजप किंवा काँग्रेस यासारख्या राष्ट्रीय पक्षांकडे न जाता आपल्या समस्या, अडचणी स्थानिक पक्षांकडे मांडाव्या. सध्या दिल्लीतील पक्षाने गोव्यात मोठी जाहिरातबाजी करून गोमंतकीयांना आकृष्ट करण्याचे धोरण अवलंबिले आहे, परंतु गेल्या निवडणुकीत या पक्षांच्या उमेदवारांची कशी धूळधाण उडाली ते गोमंतकीयांनी अनुभवले आहे. गेल्या निवडणुकीत मनोहर पर्रीकर यांनी आमच्या आधी मगोकडे फिल्डिंग लावली होती. त्यात अपयश आल्यामुळे आम्हाला जवळ केले. त्यांची ती खेळी त्यावेळी आमच्या लक्षात आली नाही. त्यातून आमची फसगत झाली, हे आपण वारंवार गोमंतकीयांना सांगितले आहे, असे सरदेसाई म्हणाले.
खरे तर गेल्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यात सेटिंग झाले होते. भाजपचेच उमेदवार विजयी व्हावे अशी काँग्रेसचीच योजना होती. तरीही लोकांनी काँग्रेसला भरभरून मतदान केले. परंतु नंतर त्यांनी मतदारांशी प्रतारणा केली व बांगडय़ांची गाथन विकावी त्याप्रमाणे 10-12 च्या संख्येने एकगठ्ठा भाजपच्या कळपात रुजू झाले, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी ‘माते’चा सौदा केला
मुख्यमंत्री सावंत हे फटिंगपणात माहीर असून म्हादईच्या विषयावर गोमंतकीयांची दिशाभूल करत आहेत. ज्या म्हादईला ते स्वतःची माता असल्याचे पुन्हा पुन्हा सांगतात, तिचा त्यांनीच सौदा केला आहे. काही दिवसांपूर्वी ते दिल्लीत गेले असताना त्यांनी गोव्याची बाजू मांडणाऱया वकिलाची साधी भेट सुद्धा घेतली नाही. आताही ते पुन्हा दिल्लीला गेले आहेत, परंतु म्हादईच्या विषयावर काहीच करणार नाहीत, असे सरदेसाई म्हणाले.
जे सरकार 10 लाख रुपये किंमतीच्या निविदाच जारी करत नाही, ते गोमंतकीय युवा कंत्राटदारांना कोणती कामे देणार? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पणजी महापालिकेचा जुने गोवेपर्यंत विस्तार करून ग्रेटर पणजी करण्यास आपला ठाम विरोध असून त्याविरोधात आता युनेस्कोला पत्र लिहिणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. अशाप्रकारे ग्रेटर पणजी झाल्यास ग्राम पद्धती समाप्त होईल, तसेच गोंयकारपणही राहणार नाही, असे ते म्हणाले. या प्रश्नी सध्या एकही आमदार आवाज उठवत नाही याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
गोव्यात पुढील दीड वर्षात वीज संपेल हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य अज्ञानपणाचे आहे. वीजेचा एवढाच पुळका होता तर गोव्यास मिळालेला कोल ब्लॉक दुसऱयास चालविण्यास का दिला असा सवाल करून गोव्यातून होणारी कोळसा वाहतूक आणि रेल्वे दुपदरीकरण हे दोन्ही प्रकल्प केवळ आणि केवळ अदानींच्या फायद्यासाठी राबविले जात आहेत, गोमंतकीयांचे त्यातून कोणतेही हीत साध्य होणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.
जॉन नाझारेथ यांचा फॉरवर्डमध्ये प्रवेश
दरम्यान, गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते जॉन नाझारेथ यांनी यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. फॉरवर्डची ध्येयधोरणे, त्यांची कार्यशैली आणि गोमंतकीयांप्रति असलेले प्रेम तसेच कामगारवर्गाप्रती असलेली आत्मियात आपणास भावली, त्यामुळे या पक्षात प्रवेश केला असे नंतर बोलताना त्यांनी स्पष्ट केले. सरदेसाई यांनी पक्षाचे चिन्ह असलेले श्रीफळ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. नाझारेथ यांना फॉरवर्डच्या एम्प्लॉई फॉरवर्ड शाखेचे निमंत्रक म्हणून नियुक्त करणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
इंडिया टुडेचा पुरस्कार हे सेटिंग
इंडिया टुडेचा गोव्याला प्राप्त झालेला सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार मिळविण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कोणतेही योगदान नाही. हा पुरस्कार हे सुद्धा एक सेटिंगच आहे. त्यासाठी सरकार पुरस्कृत एक एजन्सीच कार्यरत आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला.









