क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सीसीआय स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱया कुबेर चषक 11 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आनंद क्रिकेट अकादमी, विजया क्रिकेट अकादमी, बेळगाव स्पोर्ट्स क्लब व सीसीआय संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. अथर्व करडी, अवनीश तेंडुलकर, श्रेया पोटे, साक्षी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते किरण बेनकट्टी, प्रणय शेट्टी, मिलिंद चव्हाण, प्रशांत लायंदर, आनंद करडी, चंदन कुंदरनाड, वीरेश गौडर, सचिन साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यात 8 संघांनी भाग घेतला असून, साखळी पद्धतीचे सामने खेळविण्यात येणार आहेत.
यावेळी नागेंद्र भोसले, सॉलोमान गोकाककर, रवी पिल्ले, अनिल गवी, प्रमोद पवार, सुनील देसाई, शहाजाद पठाण, रवी कणबर्गी आदी उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात आनंद अकादमीने 20 षटकात 1 बाद 158 धावा केल्या. अथर्व करडीने 67, अद्वैतने 43 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव कोल्ट संघाने 20 षटकात 8 बाद 73 धावाच केल्या. अर्जुन व फैजुल्ला यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. आनंदतर्फे अथर्व करडीने 7 धावात 2 गडी बाद केले.
हा सामना आनंद अकादमीने 85 धावांनी जिंकला. दुसऱया सामन्यात विजया क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 6 बाद 132 धावा केल्या. अवनीश तेंडोलकरने 46 तर हमजाने 20 धावा केल्या. रॉजर्सतर्फे संकेतने 22 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर संघाने 20 षटकात 6 बाद 72 धावाच केल्या. आदित्यने 15, युवराजने 13 धावा केल्या. विजयातर्फे सुहासने 13 धावात 2 गडी बाद केले. हा सामना विजयाने 60 धावानीं जिंकला.
तिसऱया सामन्यात सीसीआय संघाने 20 षटकात 1 बाद 175 धावा केल्या. श्रेया पोटेने 53, झोया काझीने 43, कलश बेनकट्टीने 15 धावा केल्या. इडीफाय संघाने 20 षटकात 5 बाद 113 धावाच केल्या. ओंकारने 19, धनराजने 16 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयं व कलश यांनी प्रत्येकी 15 धावात 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात नीना स्पोर्ट्सने 20 षटकात 7 बाद 67 धावा केल्या.
अफनानने 11 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अवनीशने 7 धावात 2 तर साक्षीने 11 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससीने 6.3 षटकात बिनबाद 68 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. आरूष पुत्रनने 21, लक्षने 19 धावा केल्या.









