बेळगाव /क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेन्टस् कोर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग साखळी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी आनंद चॅलेंजर्स संघाने मिलन वॉरियर्स हुबळी संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून 3 गुण मिळविले. अष्टपैलू खेळी करणाऱया ज्ञानेश होनगेकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानात होत असलेल्या स्पर्धेत शुक्रवारी पावसाचा व्यत्यय आल्याने पहिला सामना रद्द करण्यात आला. दुसऱया सामन्यात आनंद चॅलेंजर्स संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना मिलन वॉरियर्स हुबळी संघाने 24.2 षटकात सर्वबाद 149 धावा केल्या. नागदिप होनगलने 2 चौकारासह 24, किरण हदगल 19, तर ओम रूपचंदानाने 15 धावा केल्या. आनंद चॅलेंजर्स संघाच्या राहुल बंजत्रीने 13 धावात 2, अधोक्षज मानवीने 19 धावात 2 तर ज्ञानेश होनगेकने 31 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल आनंद चॅलेंजर्स संघाने 17.2 षटकात 2 बाद 151 धावांसह सामना 6 गडय़ांनी जिंकला. ध्रुव नाईकने 1 षटकार, 5 चौकारासह नाबाद 43, राहुल नाईकने 5 चौकारासह 33 तर कैफ मुल्लाने 5 चौकारासह 25 धावा केल्या. मिलन वॉरियर्सतर्फे पवन जालगारने 27 धावात 2 तर नागदिप होनगल व किरण हदगल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरण कारेकर, शंतनु मानवी, परशराम पाटील, यांच्या हस्ते अष्टपैलू ज्ञानेश होनगेकरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शनिवारचे सामने :
1. विश्रृत स्ट्रायकर्स वि. आनंद चॅलेंजर्स (सकाळी 9 वाजता.)
2. साईराज वॉरियर्स वि. मिलन वॉरियर्स (दुपारी 1.30 वाजता)
दिवंगत क्रिकेटपटू विवेक उघाडेला श्रद्धांजली

बेळगावचा उगवता तारा म्हणून नावारूपाला येत असलेला होतकरू यष्टीरक्षक व आक्रमक फलंदाज विवेक उघाडे यांचे नुकतेच निधन झाले. विवेक शिवाजी उघाडे यांची बीपीसी लीग स्पर्धेसाठी निवड झाली होती.
विवेकची गतवषी धारवाड विभागीय संघात निवड झाली होती. त्याने या स्पर्धेत यष्टीरक्षणामुळे वेगळीच छाप सोडली होती. त्याची 16 वर्षाखालील कर्नाटक संघात निवड होईल असे वाटत होते. पण दुर्दैवाने कर्नाटक संघात यापूर्वीच तीन यष्टीरक्षक फलंदाज असल्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. पण त्यामुळे नाउमेद न होता विवेकने जोमात सराव करून शालेय स्पर्धेत चमक दाखविली. दोन वर्षापूर्वी यष्टीरक्षण करतेवेळी विवेकच्या पायाला चेंडू लागून तो जखमी झाला होता. उपचारानंतर त्याने सराव चालू ठेवला होता. पण ऑगस्टमध्ये विवेकचे आकस्मिक निधन झाल्याने क्रिकेट शौकीनांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विवेकच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केल्यानंतर एक मिनिट मौन पाळून त्याला श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी त्याच्या आठवणीने साऱयांचेच डोळे अश्रुने भरून आले. त्याची उणीव या मैदानात प्रकर्षाने जाणवली.









