12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
आनंद क्रिकेट कोचिंग अकादमी आयोजित 12 वर्षाखालील आंतरक्लब एसीए चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने एआयएमएस सावंतवाडी संघाचा 7 धावांनी पराभव करून एसीए चषक पटकाविला. अष्टपैलू कामगिरी केलेल्या सुप्रित गेंजीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद कोचिंग क्रिकेट अकादमीने 20 षटकांत 4 बाद 156 धावा केल्या. त्यात सन्मुख रेड्डीने 37, निलेश रनसुबेने नाबाद 33, ओम जकातीने 27, सिद्धार्थ गुरवने 23 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे आसमखानने 1 गडी बाद केला. त्यानंतर एआयएमएस संघाने 20 षटकात 4 बाद 149 धावाच केल्या. त्यात इशांत काबाडीने 41, निरज जाधवने 36, आर्यन दुडवाडकरने 20 धावा केल्या. आनंदतर्फे सुप्रित गेंजीने 10 धावात 3 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रविचंद्रन रेड्डी, नंदकुमार मलतवाडकर, अनंत करडी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सन्मुख रेड्डी (आनंद), उत्कृष्ट गोलंदाज आसमखान (सावंतवाडी), मालिकावीर निलेश रनसुबे (आनंद अकादमी) यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









