ऑनलाईन टीम
कोरोना लसीसंदर्भात आज देशवासियांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. सर्वच भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या लसीला आज आपत्कालीन वापरासाठी अखेर परवानगी मिळाली. भारतीय बनावटीच्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे.
सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. देशात काल पासून लसीच्या ड्राय रनची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती मिळते की नाही याची प्रतीक्षा होती. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.