ग्रँडमास्टर्सविरुद्ध खेळण्यासाठी 150 डॉलर्सचे शुल्क
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद व अन्य 4 भारतीय ग्रँडमास्टर्स अन्य बुद्धिबळपटूंविरुद्ध ऑनलाईन प्रदर्शनीय सामने खेळणार असून या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी ते आर्थिक साहाय्य मिळवून देणार आहेत. सदर ऑनलाईन सामने उद्या (गुरुवार दि. 13) खेळवले जातील. विश्वनाथन आनंदसह कोनेरु हम्पी, द्रोणावली हरिका, निहाल सरिन व प्रज्ञानंदा रमेशबाबू यांचा या उपक्रमात सहभाग आहे.
चेस डॉट कॉम ब्लित्झ किंवा 2000 च्या खालील फिडे स्टँडर्ड रेटिंग असणारा कोणताही खेळाडू 150 अमेरिकन डॉलर्सची देणगी अदा करुन आनंद तसेच अन्य 4 ग्रँडमास्टर्सविरुद्ध खेळू शकतो. या ऑनलाईन सामन्यांसाठी 25 डॉलर्सचे अतिरिक्त नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे. चेस डॉट कॉम वेबसाईटवर सायंकाळी 7.30 पासून डोनेशन्स स्वीकारले जातील. या ऑनलाईन प्रदर्शनीय सामन्याच्या माध्यमातून 10 हजार डॉलर्स इतकी रक्कम जमा करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
आनंद, हम्पी, सरिन, हरिका, रमेशबाबू आदी ग्रँडमास्टर्सच्या उपक्रमांतर्गत एकत्रित झालेली रक्कम रेड क्रॉस इंडिया व अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या चेकमेट कोव्हिड इनिशिएटिव्हकडे सुपूर्द केली जाणार आहे. चेस डॉट कॉमवरील या लाईव्हस्ट्रीमचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय मास्टर डॅनी रेन्स्च व समय रैना करणार आहेत. प्रत्येक सामन्यासाठी 30 मिनिटांची मर्यादा आणि प्रत्येक चालीसाठी 30 सेकंदाची इनक्रिमेंट हे नियम येथे लागू असणार आहेत.
आनंदचा संदेश
‘भारत कोव्हिडविरुद्ध लढय़ात प्रचंड झगडत आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आपल्या सर्वांनाच याचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे फटका सोसावा लागला आहे. अशी एकही व्यक्ती नसेल, मग ती तरुण असो किंवा वयस्कर ज्यांना याची झळ बसलेली नाही. या पार्श्वभूमीवर, आपण मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. कोव्हिडला नमवण्यासाठी ही छोटीशी मदत असेल’, असे आनंद याप्रसंगी एका व्हीडिओ संदेशातून म्हणाला. तसेच या उपक्रमाला पाठबळ दर्शवण्याचे आवाहनही त्याने यावेळी केले.









