रहिवाशांमधून संताप : काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गोवावेस येथील आनंदवाडी-हिंदवाडी कॉर्नर येथे दीड महिन्यापूर्वी चर खोदून ठेवण्यात आली होती. परंतु अद्याप हे काम पूर्ण करण्यात आले नसल्याने आनंदवाडीकडे जाणारा मार्ग ठप्प आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे हा परिसर चिखलमय झाला असून हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहापूर ते गोवावेस या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी इतर वाहिन्या व गटारीचे काम केले जात आहे. आनंदवाडी-हिंदवाडी कॉर्नर येथे दीड महिन्यापूर्वी चर खोदण्यात आली होती. परंतु तेव्हापासून काम ठप्प असल्याने हा रस्ता बंद आहे.
मुख्य रस्ताच बंद
मुख्य रस्ता बंद असल्याने नागरिकांना इतर मार्गाने ये-जा करावी लागत आहे. रुग्णवाहिकाही इतर मार्गाने घेऊन जाव्या लागत आहेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.