अतिक्रमणामुळे नाल्याचे अस्तित्त्वच संपुष्टात : नाल्याची समस्या निवारण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा

प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध नाल्यांवर अतिक्रमण झाले असल्याने नाल्यांमधील सांडपाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अशीच अवस्था वडगाव आनंदनगर परिसरातील नाल्याची झाली असल्याने आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरात सांडपाण्याचे तळे साचत आहे. त्यामुळे नाला मोकळा करून बांधकाम करण्याच्यादृष्टीने रहिवाशांनी हालचाली चालविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हिंदवाडी, अनगोळ, वडगाव स्मशान अशा विविध भागात वाहणारा नाला आनंदनगर परिसरामधून वाहत बळ्ळारी नाल्याला मिळतो. सध्या या नाल्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याने नाल्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. पण नाल्याचे पाणी गटारींमधून वाहत असल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुसरा क्रॉस परिसरातील गटारींचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी पाझरून विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. गटारींमधून वाहणारे सांडपाणी परिसरातील खुल्या भूखंडावर साचत असल्याने भूखंडाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे आनंदनगर परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळा आला की नाल्याचे पाणी साचण्याचा तसेच घरांमध्ये घुसण्याचा धोका असतो. त्यामुळे नाल्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार नाल्याचे बांधकाम आणि नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. पण काही इमारत धारकांनी नाल्यावर बांधकाम केले असल्याने नाल्याचे बांधकाम रखडले आहे. नाल्याचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता. पण नागरिकांच्या विरोधामुळे नाल्याचे बांधकाम रखडले आहे. मात्र, सध्या नाल्यामधून वाहणाऱया सांडपाण्याचा त्रास सर्वांना होत असल्याने या समस्येचे निवारण करण्याचा विचार आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरातील रहिवाशांनी चालविला आहे. याकरिता आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरातील रहिवाशांनी प्रयत्न चालविले आहेत. याकरिता काही रहिवाशांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
अतिक्रमित इमारतधारकांशी चर्चा करणार
यापूर्वी नाल्याचे सर्वेक्षण करून मार्किंग करण्यात आले होते. पण नाल्यावर बांधकाम केलेल्या इमारतधारकांनी याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे नाल्याच्या समस्येचे निवारण झाले नाही. पण महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नाल्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी सर्व रहिवासी तसेच नाल्यावर घरे असलेल्या इमारतधारकांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे.
आनंदनगरमधील नाल्याची समस्या गंभीर बनत चालली असल्याने सर्व रहिवाशांना विश्वासात घेऊन नाल्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा विचार सुरू आहे. याकरिता येथील रहिवाशांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नाल्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन रहिवाशांच्यावतीने करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









