वृत्तसंस्था/ चेन्नई
माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदचा लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील खराब फॉर्म पुढे चालू राहिला असून सलग सहाव्या फेरीतही त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. रशियाच्या इयान नेपोमनियाचीने त्याला या फेरीत 3-2 असे हरविले.
आनंदने सहाव्या फेरीत ड्रॉने सुरुवात केली. बचावात्मक चालींचे उत्तम प्रदर्शन करीत त्याने नेपोमनियाचीला विजयापासून दूर ठेवले. 53 चालीत हा डाव अनिर्णीत राहिला. दुसऱया डावात मात्र नेपोमनियाचीने शानदार प्रदर्शन करीत 34 चालीत विजय मिळवून आनंदवर आघाडी घेतली. तिसरा डाव 48 चालीत बरोबरीत राहिल्यानंतर शेवटच्या चौथ्या डावात आनंदने झुंजार खेळ करून 42 व्या चालीत विजय मिळवित बरोबरी साधली. त्यानंतर आर्मागेडॉन (टायब्रेक) मधील निर्णायक लढतीत नेपोमनियाचीने 41 चालीत विजय मिळवित आनंदवर आणखी एक पराभव लादला.
वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने विजयी घोडदौड कायम राखली असून त्याने 17 गुणांसह अग्रस्थान मिळविले आहे. नेपोमनियाची 16 गुणांसह दुसऱया व त्याचाच देशवासी क्रॅमनिक 12 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. मॅग्नस कार्लसन टूरवरील या स्पर्धेत प्रथमच खेळणारा आनंद 3 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा ही कार्लसन टूरचा एक भाग असून यातील विजेता 9-20 ऑगस्ट या कालावधीत होणाऱया ग्रँड फायनलसाठी पात्र ठरणार आहे.
सहाव्या फेरीतील निकाल : नेपोमनियाची वि.वि. आनंद 3-2, कार्लसन वि.वि. लिरेन डिंग 2.5-1.5, अनिश गिरी वि.वि. पीटर लेको 2.5-1.5, क्रॅमनिक वि.वि. बोरिस गेलफँड 3-2, पीटर स्विडलर वि.वि. व्हॅसील इव्हान्चुक 3-2.









