सध्याच्या काळात सोशल मीडियाने जगात थैमान माजवले आहे. रोज नवनवीन मुद्दे घेऊन सोशल मीडिया विश्वात कोणी ना कोणी ‘टेण्ड’ होत असतात. पण जितक्मया झपाटय़ाने एखादी ‘टेण्ड’ सोशल मीडियावर गाजते, तितक्मयाच वेगाने ती प्रसिद्धी मावळतेसुद्धा. सोशल मीडियाची निर्मिती ही माणसांना जोडण्यासाठी झाली होती. जगात जेव्हा इंटरनेटची निर्मिती झाली, तेव्हा हा शोध एक क्रांतिकारक वरदान म्हणून बघितला गेला होता. जगातल्या कोणत्याही कोपऱयातील माणसाशी संवाद साधणे हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच. पण दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांना जोडणारे हे माध्यम समाजात अशांतता पसरवण्याचे सर्वात मोठे कारण कधी बनून गेले, कळलेदेखील नाही. हे व्यासपीठ माणूस अभिव्यक्तीचे साधन म्हणून नाही तर एकमेकांच्या परिस्थितीतून करमणूक मिळवण्याचे ठिकाण म्हणून वापरू लागला आहे. आभासी विश्वाच्या जाळय़ात तो इतका गुंतला आहे की स्वतःच्या मनावरचा ताबा आणि जागरूकता गमावू लागला आहे. तंत्रज्ञानदृष्टय़ा या सामाजिक माध्यमाने जरी क्रांती घडवून निरंतर प्रगतीला प्रोत्साहन दिले असले, तरी भावनिकदृष्टय़ा माणूस इतरांशी आणि स्वतःशी विलग होऊ लागला आहे. जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटकांवर या सामाजिक माध्यम आधारित जीवनशैलीचा खूप नकारात्मक परिणाम होतो.
1. झोप- तंत्रज्ञानप्रगत जगात, जितका अन्न, वस्त्र आणि निवारा महत्त्वाचा आहे, तितकाच भ्रमणध्वनी हा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. प्रत्येकाकडे 24 तास हे यंत्र सहज उपलब्ध असल्याने वैयक्तिक अंतर पाळले जात नाही. अमर्याद विनियोग हाताच्या एका बोटावर उपलब्ध असल्याने माणूस सहजपणे त्यात वाहून जातो. अशा परिस्थितीत त्याला वेळेचे भान राहत नाही. दिवसभर तणावपूर्ण कामे केल्यानंतर शरीराबरोबरच मेंदूलादेखील विश्रांतीची तेवढीच गरज असते. पण सामाजिक माध्यमाच्या या जाळय़ात गुंतल्यानंतर माणसाला वेळेचे भान राहत नाही. स्वतःच्या आरोग्यापेक्षा माणूस अनोळखी, आभासी माणसांच्या घडामोडीत गुंतला जातो. अशा वेळेला, उशिरापर्यंत विविध सामाजिक माध्यमांवर व्यग्र राहिल्यामुळे झोप अपूर्ण राहते. शरीराने दिवसभर सोसलेल्या कष्टामुळे, तणावामुळे जी झीज झालेली असते त्याची भरपाई होण्यासाठी किमान 7-8 तासाची झोप आवश्यक आहे. या गोष्टींची दक्षता घेतली नाही तर अनेक शारीरिक आजारांना आमंत्रण दिले जाईल.
2. मानसिक आरोग्य- आजकाल मोठय़ांसह लहानांकडेदेखील भ्रमणध्वनी दिले जातात. पूर्वी एकच टेलिफोन घरात असल्याने त्याचा मर्यादित वापर होत असे. पण आता प्रत्येकाचा स्वतंत्र फोन असल्याने त्या माध्यमाचा अति वापर होऊ लागला आहे. तंत्रज्ञान आपल्या सतत आजूबाजूला असल्याने त्यात बिंबवल्या जाणाऱया जीवनशैलीच्या अवास्तव अपेक्षांचा नकारात्मक प्रभाव मनावर पडतो. किशोरावस्थेत असलेल्या मुलाच्या मनावर हे विशेषतः दिसून येते. ही मुले जगाचे भविष्य आहेत. त्यांना
क्रांतिकारक आणि समाजवादी शिकवण मिळण्याऐवजी खोटय़ा आणि अवास्तव गोष्टींच्या चक्रव्यूहात ते अडकले जातात. इतक्मया पोकळ अपेक्षा घेऊन वाढत असताना, या मुलांच्या मनावर चुकीचे संस्कार नकळतपणे होत असतात, ज्यामुळे पुढे जाऊन मानसिक अशांतता आणि आजारांचे प्रमाण वाढते.
3. आत्मविश्वास- सामाजिक माध्यमांवर प्रत्येक जण आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत असतो. ते करायला तो विविध साधने वापरतो. छोटय़ा छोटय़ा घडामोडींची बातमी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप इत्यादीवर टाकून त्याचा बाऊ करून खोटी प्रशंसा मिळवतो. आपल्या छायाचित्रांवर कृत्रिम आवरणे टाकून स्वतःचे रूप बदलण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्या चित्रांना प्रशंसा नाही मिळाली तर स्वतःला कमी लेखू लागतो व इतरांशी तुलना करू लागतो. आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की सामाजिक माध्यमाच्या तात्पुरत्या टिप्पण्यांवरून आपल्या अस्तित्वाचे महत्त्व कमी किंवा जास्ती होत नाही. माणसाने इतरांच्या मतानुसार स्वतःला पारखण्याऐवजी स्वकर्तृत्वाने सन्मान मिळवला पाहिजे. तसेच एखाद्या माणसाच्या रंगाने, कपडय़ाने किंवा बाह्य रूपाने त्याचे मूल्य ठरवू नये.
4. एकाग्रता- कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित असणे गरजेचे असते. जर एकाग्रतेने कोणतेही काम केले तर ते निश्चितच यशस्वी होते. पण, सामाजिक माध्यमाचा पाया हा अतिशय गतिमान माहितीवर आधारित आहे. कोणतेही चित्र, लेख, संदेश हे चुटकीसरशी येतात आणि गायब होतात आणि हे सर्व एकाच वेळेला होत असते. जगाची एवढी भरमसाठ माहिती एकाच वेळेला मेंदूपर्यंत पोहोचते, त्यामुळे त्यातली नक्की कोणती माहिती संकलित करायची आणि कोणती सोडून द्यायची हे त्या बिचाऱया मेंदूला कळतच नाही. त्यामुळे लक्ष कालावधी कमी होतो आणि चंचलपणा वाढतो.
5. सामाजिक सुसंवाद- सामाजिक माध्यमांच्या निर्मितीपूर्वी एखाद्या माणसाशी संपर्क साधायचा असला की प्रत्यक्ष जाऊन भेटणे किंवा पत्रव्यवहार अशी काही मोजकीच साधने होती. समोरून उत्तर यायला वेळ लागला तरी आपल्या परिचयाच्या माणसांशीच आपला संपर्क होत असे. नवीन ओळखी या वैयक्तिक भेटीनंतरच व्हायच्या. त्यामुळे आजूबाजूच्या माणसांमध्ये एक पारदर्शकता असायची. पण या आभासी विश्वात माणूस सामाजिक माध्यमावर बनवलेल्या अतिरंजित प्रतिमेमागे लपतो आणि स्वतःचीच ओळख विसरतो. आज ऑनलाईन भेटी आधी आणि मग प्रत्यक्ष भेटी होतात. त्यामुळे माणूस भौतिक तारा जोडण्याआधी इंटरनेटच्या तारा अधिक जोडू लागला आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱया माणसांपेक्षा सोशल मीडियावर असलेल्या अनोळखी माणसांशी अधिक संवाद साधू लागला आहे. आणि हे वर्तन सामान्य माणसापर्यंतच मर्यादित नसून अगदी मोठमोठय़ा कीर्तिमान लोकांमध्येसुद्धा आढळते. ट्विटरसारख्या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेत्यांची वायफळ भांडणे, कोणी टाकलेल्या टिप्पण्यांवर भलतेच गैरसमज, मोठमोठय़ा नेत्यांच्या, राष्ट्राध्यक्षांच्या मतांवर उघड टीका, त्यावरून होणारी आंदोलने अशा सामाजिक शांतता भंग करणाऱया वायफळ घडामोडी रोज पहायला मिळतात. जगाच्या एका कोपऱयात कोणी कुठली टीका केली, त्यावर काय चर्चा झाली यावरून जगाच्या दुसऱया कोपऱयात आंदोलन करण्याऐवजी माणसाचे कर्तृत्व काय आहे व त्याने समाजाला काय योगदान दिले आहे यावर जास्त लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियाच्या मायाजालात न अडकता, सद्यकालीन समस्यांना एकत्र सामोरे जाऊन जगाच्या उद्धाराकडे वाटचाल केली पाहिजे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे आपल्या संस्कृतीचे गमक आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर येणाऱया भरमसाठ संदेशाशी नीरक्षीर विवेकाने वागण्याची शिकवण आपण पुढच्या पिढीला दिली तरच या तंत्रज्ञानाचा योग्य वापर होईल.
श्राव्या माधव कुलकर्णी








