गोव्याच्या ऑनलाईन शिक्षण चॅनेलचा शुभारंभ
प्रतिनिधी/ पणजी
उच्च शिक्षण संचालनालयातर्फे तयार केलेल्या ‘दिष्टावो’ हा शैक्षणिक उपक्रम देशातील पहिला स्वयंपूर्ण उपक्रम असून नव्या आधुनिक गोव्याच्या जडणघडणीत त्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. उच्च शिक्षण संचालनालयातर्फे कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात काल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘दिष्टावो’ या युटय़ूब चॅनेलच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोल होते..
व्यासपीठावर उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, डॉ. अनिल डिंगे, डॉ. विठ्ठल तिळवे, प्रा. वंदना नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
संकटाच्या काळातही पुढे जाता येते
उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांच्या दूरदृष्टीतून आकाराला आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. संकटाच्या काळातही पुढे जाता येते, हा संदेश ‘दिष्टावो’ या शैक्षणिक उपक्रमाने दिलेला आहे असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
‘ई मित्र’ संकल्पना साकारण्यात येणार
कोविडच्या पार्श्वभूमीवर संकटातही पुढे जाता येते हा निश्चय करून ‘दिष्टावो’ या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर जसे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण दिले जाते तसेच दिष्टावोच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आहे, त्यांच्याशी इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांना जोडून ‘ई मित्र’ संकल्पना साकारण्यात येणार आहे.
‘दिष्टावो’त वीस हजार व्हिडिओची निर्मिती : लोलयेकर
दिष्टावोअंतर्गत 20 हजार व्हिडिओ तयार करण्यात आले असून 1000 व्हिडिओ चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहेत. हा उपक्रम गोव्यातील शिक्षकांना अर्पण करण्यात आला आहे. दिष्टावो या उपक्रमांतर्गत कोकणी साहित्य पहिल्यांदाच जागतिक पातळीवर पोहोचणार असून अत्यंत कमी खर्चात आखलेला हा उपक्रम आत्मनिर्भर उपक्रम म्हणून गणला जात असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी दिली.
उपक्रमात 1200 शिक्षक, 55 तंत्रज्ञांचा सहभाग
या उपक्रमांतर्गत व्हिडिओबरोबरच शैक्षणिक सामग्री आणि नोट्सही उपलब्ध होणार आहेत. जवळपास 3500 व्हिडिओ रेकॉर्ड केले असून 1000 व्हिडिओ दिष्टावो चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. यामध्ये तब्बल 1200 शिक्षकांचा सहभाग असून 55 टेक्नीकल शिक्षकांची टीम कार्यरत आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या पाच व्हिडिओ स्टुडिओसह गोवा विद्यापीठ आणि पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय मडगाव येथील व्हिडिओ स्टुडिओ यांचा देखील वापर दिष्टावोसाठी करण्यात आला असल्याची माहिती प्रा. वंदना नाईक यांनी दिली.
उच्च शिक्षण संचालनालयाकडून शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये महाविद्यालयांमध्ये ई लर्निंगला अधिक चालना देण्यासाठी दिष्टावो हे युटय़ूब चॅनेल सुरू करण्यात आले आहे. या युटय़ूब चॅनेलवर विद्यार्थ्यांना पूर्व चित्रित लेक्चर्स पाहायला मिळणार आहेत. दिष्टावो म्हणजेच ‘डिजिटल इंटिग्रेटेड सिस्टम फॉर होलिस्टिक टीचिंग अँड व्हर्च्युअल ओरिएंटेशन’ हा चॅनल राज्यातील पहिलाच शिक्षणाशी संबंधित चॅनेल असून यात राज्यभरातील शंभराहून अधिक महाविद्यालयातील शिक्षकांनी आपापले लेक्चर करून यात भाग घेतलेला आहे. या चॅनेलवर बीए, बीएससी, बी. कॉम, संगीत व विज्ञान या सर्व विषयांच्या लेक्चर्सचे रेकॉर्डिंग आहे. दिष्टावोच्या माध्यमातून गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे, लेक्चर्सच्या रूपात, एक समग्र व सर्वसमावेश ऑनलाईन ई सामग्री तयार करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रसाद लोलयेकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये व आभार डॉ. अनिल डिंगे यांनी मानले.









