प्रतिनिधी/ पणजी
’स्मार्ट सीटी’ प्रकल्पांतर्गत पणजीत बसविण्यात आलेल्या सिग्नल व्यवस्थेतील अव्यवस्थेवर दै. तरुण भारतने उजेड टाकल्यानंतर आता याच व्यवस्थेतील अविचारीपणाही समोर आला आहे. मांडवीवरील जुन्या पुलावर बेतीच्या बाजूने चक्क पुलाच्या टोकावरच सिग्नल यंत्रणा उभी करून संबंधितांनी आपला स्मार्टपणा दाखवून दिला आहे. या प्रकाराबद्दल सध्या वाहनचालकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सीटी’ प्रकल्पांतर्गत पणजी शहरात ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यातील काही ठिकाणी अत्यंत आदर्श व्यवस्थापन करण्यात आले असून वाहतुकीत सुलभता आणि सुसुत्रता आली आहे. याउलट काही ठिकाणी मात्र व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असून पूर्वीच्या सुव्यवस्थित चालणाऱया वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे. त्यामुळे ही व्यवस्था म्हणजे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
याचा अनुभव दिवजा सर्कलजवळ चारही बाजूनी बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली तेव्हा आला होता. या यंत्रणेमुळे पहिल्याच दिवशी तेथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. त्यातून वाहनाचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारावर दै. तरुण भारतने तत्काळ उजेड टाकला असता दुसऱयाच दिवसापासून सदर यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तात्पुरता का होईना, सुटकेचा निस्वास टाकला आहे.
दरम्यान, आता अशाच प्रकारे व्यवस्थापनातील अभाव दर्शवणारा अन्य एक प्रकार समोर आला आहे. मांडवीवरील जुना पूल पार केल्यानंतर लगेचच बेतीच्या बाजूने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. आधीच हा पूल दुहेरी वाहतुकीसाठी खुला असल्याने अखंडित वाहनांच्या वर्दळीने भरून गेलेला असतो. अशावेळी सिग्नलमुळे एका मीनिटासाठी वाहतूक थांबल्यास काय परिस्थिती ओढवेल याचा अभ्याससुद्धा झालेला नाही, असेच दिसून येत आहे.
बेती परिसरातून पर्वरीत जाणारी किंवा पणजी शहरात येणारी वाहने जुन्या मांडवी पुलाच्या टोकावरच प्रमुख रस्त्यावर येतात. त्यामुळे अनेकदा तेथे वाहतुकीचा खोळंबा होतो. अटल सेतूखाली असलेल्या बेटाला वळसा घालून ही वाहने नव्या मांडवीपूलमार्गे पणजीत प्रवेश करण्यासाठी येतात. त्यामुळे जुन्या पुलावरून पर्वरीला जाणारी वाहने थांबवावी लागतात. आतापर्यंत हे व्यवस्थापन स्वतः वाहनचालकच करत होते. कधीकधी त्यावर पोलिसही नियंत्रण ठेवत होते. आता ती व्यवस्था हाताळण्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून ती कार्यान्वित झाल्यानंतर तेथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होणार हे नक्की आहे, अशा प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केल्या आहेत.









