खासगी इस्पितळाचा प्रताप, मृत्यूनंतर दागिनेही गायब
त्
प्रतिनिधी बेळगाव
एकीकडे कोरोना महामारीचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे. बाधितांवर योग्य उपचार मिळणे कठीण होत आहे. इतर रुग्णांचेही उपचाराविना हाल होत आहेत. या परिस्थितीचा लाभ काही मंडळी घेताना दिसत आहेत. श्वसनाचा त्रास असणाऱया वृद्धेला खासगी इस्पितळात प्रवेश देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून दोन लाखांचा धनादेश घेण्यात आला आहे. एका कर्मचाऱयाने तर त्या वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचा प्रकारही घडला आहे.
गुरुवारी मध्यरात्री कपिलेश्वर मंदिर परिसरातील एका खासगी इस्पितळात हा प्रकार घडला आहे. पाच तासांच्या उपचारासाठी 43 हजार रुपयांची पावती फाडण्यात आली आहे. अखेर उपचारांचा उपयोग न होता त्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांना मृतदेह देण्यासाठी पोलीस अधिकाऱयांना मध्यस्थी करावी लागली.
बैलहोंगल येथील एका 68 वर्षीय वृद्धेला श्वसनाचा त्रास सुरू झाला. गुरुवारी कुटुंबीयांनी उपचारासाठी तिला बेळगावला आणले. खासगी इस्पितळात कुठेच उपचारांची व्यवस्था होईना. मध्यवर्ती भागातील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी एक बेड मिळाला. मात्र तिला दाखल करून घेण्याआधी किमान दोन लाखांचा धनादेश द्यावा लागेल, अशी अट घालण्यात आली.