प्रतिनिधी / कुरुंदवाड
सध्या कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन असल्याने सर्वसामान्य लोकांना आधार कार्ड ग्राह्य मानून धान्य पुरवठा करावा अशी मागणी येथील सुनील जुगळे युवाशक्ती व पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने तहसीलदार शिरोळ यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात लॉक डाउन असल्याने शेतमजूर कामगार सर्वसामान्य लोकांना शासनाने स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदूळ वाटप केला जात आहे मात्र अनेक लोकांची शिधापत्रिका महापुरात वाहून गेली आहे. त्यामुळे संबंधित खात्याने अशा गरजू लोकांना शिधापत्रिकेवर ऐवजी आधार कार्ड ग्राह्य मानून धान्य पुरवठा करावा संचार बंदीमुळे गरीब गरजू कामगार शेतमजूर यांना काम नाही व हातात पैसेही नाहीत अशी परिस्थिती झाली आहे.
त्यांच्यावर पैसा नसल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पण अनेक ठिकाणी शिधापत्रिकेवर धान्य वितरण करत असताना 12 अंकी कोड असल्याशिवाय धान्य दिले जात नाही पण अनेकांचे रेशन कार्ड नसल्यामुळे शासनाच्या या सवलती पासून त्यांना वंचित रहावे लागत आहे. तरी तालुकास्तरावर तरी किमान अशा लोकांना आधार कार्ड ग्राह्य मानून धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून सध्याच्या बिकट परिस्थितीत आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नये असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे व आधार कार्ड ग्राह्य मानूनच धान्य पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सुनिल जुगळे आ़दि.पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.








