अर्थसंकल्पीयअधिवेशनात विधेयक आणले जाणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ला
आधार कार्डाची जोडणी मतदार ओळखपत्राशी करण्याची अनुमती निवडणूक आयोगाला देण्याची तरतूद असणारे विधेयक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानेच तशी मागणी केली आहे. कायदा मंत्रालय यावर विचार करत असून लवकरच विधेयक तयार केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनेक व्यक्तींकडे एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळून आले आहे. तसेच अनेकांची नावे एकाहून अधिक मतदान केंद्रांवर नोंद आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळी गैरप्रकार होतात. हे टाळण्यासाठी सर्व मतदार ओळखपत्रे आता आधार कार्डाशी जोडली जाणे आवश्यक आहे, अशा निर्णयाप्रत सरकार आले असून ही जोडणी केल्यास निवडणुकीतील भ्रष्टाचार टाळण्यास साहाय्य होणार आहे असे सरकारच्या काही सल्लागारांचे म्हणणे व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाने नुकतेच केंद्रीय कायदा मंत्रालयाला एक पत्र पाठविले असून त्यात आधार आणि मतदारकार्ड यांच्या जोडणीची मागणी केली आहे. सध्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात तशी तरतूद नसल्याने निवडणूक आयोगाचे हात बांधले गेले आहेत. म्हणून सरकारने या संदर्भात नवा कायदा आणण्याची तयारी केली आहे. मात्र, हे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाते की पुढच्या, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. तरीही सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे विधेयक लगेचच आणण्यात येईल.









