निक्की गलरानी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. निक्कीने स्वतःच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. अभिनेत्रीने अलिकडेच स्वतःचा प्रियकर आदि पिन्नीशेट्टीसोबत साखरपुडा केला आहे. यासंबंधी दोघांनीही सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करत माहिती दिली आहे.

निक्की आणि आदिने 24 मार्च रोजी स्वतःच्या नात्यावर अधिकृत मोहोर उमटविली आहे. आम्ही काही वर्षांपूर्वी परस्परांना भेटलो होतो आणि आता आमचे नाते अधिकृत झाले आहे. हा दिवस आमच्यासाठी अत्यंत विशेष होता आणि दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत आम्ही साखरपुडा केला आहे. या नव्या प्रवासावर आम्ही तुम्हा सर्वांकडून प्रेम आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो असे निक्कीने ट्विट करत म्हटले आहे.
या जोडप्याचा विवाह मे महिन्यात होणार असून याकरता दोघांनीही आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आदि आणि निक्कीचा विवाहसोहळा चेन्नईत पार पाडणार आहे. आदि आणि निक्की यांनी ‘यागवरयिनम ना काक्का’ आणि ‘मारगधा नानायम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. तर आदिने तापसी पन्नूसोबत नीववरो या चित्रपटात काम केले होते.









