मुंबई / ऑनलाईन टीम
मोफत लसीकरणावरून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता असल्याचे दिसत नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्याने हा गोंधळ अधिकच समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोफत लसीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील. कोरोना संकटाचा सामना धैर्याने केला जात असून मुंबईतही डबलिंग रेट कमी झाला आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून सरकारसोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला तरच संकट मागे जाईल. मुख्यमंत्री पूर्ण जोर लावत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली होती. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट काय होते?
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणाविषयी माहिती दिली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
Previous Articleजम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 2,831 नवे कोरोना रुग्ण
Next Article कोरोना लढ्यात अमेरिका देणार भारताला साथ








