रामायणात कैकयीने प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षांच्या वनवासाकरिता पाठवले. प्रभू श्रीरामांनी महाराजा दशरथ आणि महाराणी कैकयीचा आदेश शिरसावंद्य मानून वनवास स्वीकारला आणि 14 वर्षानंतर अयोध्येला परतले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. आपल्या सर्वांना ही घटना माहीत आहे. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांच्या वनवासाकरिता कधीही तक्रार केली नाही किंवा स्वतःच्याच वडिलांविरुद्ध बंडही केले नाही. एक आदर्श राजा हाच एक उत्तम प्रशासक असतो आणि सर्वोत्तम व्यवस्थापकही असतो हे प्रभू श्रीरामांनी त्यांच्या आचरणातून दर्शवले.
ज्याला/जिला समूहाचे नेतृत्व करायचे असेल, सर्वोत्तम दर्जाचे व्यवस्थापक होऊन जनकल्याण करायचे असेल त्याने/तिने श्रीसमर्थांचा दासबोध आणि प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा सातत्याने अभ्यास करावा. कुठल्याही औद्योगिक संस्थेत कर्मचाऱयांच्या किंवा कामगारांच्या तक्रारी जर धोकादायक स्वरूप धारण करत असतील तर त्या आधीच ओळखणे गरजेचे आहे. तक्रारी गंभीर स्वरूप धारण करण्याआधीच त्या समस्य जाणून घेण्याचे मार्ग म्हणजे निरीक्षण, तक्रार पेटी, कर्मचाऱयांच्या मुलाखती आणि मुक्तद्वार धोरण होय!
निरीक्षण ह्या मार्गानुसार व्यवस्थापक अथवा पर्यवेक्षक त्यांच्या कनि÷ सहाय्यकांच्या वागणुकीचा मागोवा घेतात. एखादा कर्मचारी इतरांसोबत सहकार्याने काम करत नसेल किंवा निष्काळजीपणाने कार्यालयातील, आस्थापनेतील किंवा कार्यक्षेत्रातील साहित्याची नासधूस करत असेल, सातत्याने गैरहजर रहात असेल तर उत्तम व्यवस्थापकाच्या हे लगेचच लक्षात यायला हवे. अशाप्रकारची अयोग्य वर्तणूक सातत्याने दिसून आल्यास त्यावर त्वरित कारवाई करावी.
तक्रारपेटीच्या माध्यमातून कामाशी संबंधित प्रत्येक तक्रारीकरिता औद्योगिक संस्थेत मध्यवर्ती ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. ह्या अशा तक्रारपेटीमुळे कर्मचारी मुक्तपणे, कुणालाही न घाबरता आपल्या मनातील असमाधानी आणि अन्यायाची भावना व्यक्त करू शकतात. जर एखाद्या कर्मचाऱयाला बाहेर दुसऱया/इतर औद्योगिक संस्थेत अथवा कंपनीत चांगली संधी मिळाली आणि जर असा कर्मचारी असमाधानी असेल तर त्वरित तो ती संधी पटकावण्याचा प्रयत्न करतो. कर्मचाऱयाने/कामगाराने दुसऱया कंपनीत जाण्यापूर्वीच त्याची/तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे ह्याचे आकलन, विश्लेषण करून योग्य न्यायनिवाडा करणे हे उत्तम व्यवस्थापकाचे लक्षण आहे. मुलाखत तंत्राद्वारे हे साध्य होऊ शकते.
काही औद्योगिक संस्थांमध्ये मुक्तद्वार धोरण राबवले जाऊन कर्मचाऱयांना व्यवस्थापकांच्या कक्षात प्रत्यक्ष जाऊन आपापल्या तक्रारी सांगता येतात. हे धोरण केवळ मोठय़ा उद्योग समूहातच राबवले जाऊ शकते. छोटय़ा किंवा लघुउद्योगात ह्या धोरणांची अंमलबजावणी करणे शक्मय नाही. अनेकवेळा कर्मचारी अथवा कामगारसुद्धा मानसिक आणि सामाजिक ताणांमुळे/कारणांमुळे मुक्तद्वाराने प्रवेश करणे टाळतातच. समर्थांनी अतिशय मार्मिक शब्दात ह्या तक्रारीबाबत श्रीमतदासबोधात म्हटले आहे की,
आतां बद्ध तो जाणिजे ऐसा !
अंधारीचा अंध जैसा !
चक्षुवीण दही दिशा !
सुन्याकार !!
न दिसे नेणे कर्माकर्म !
न दिसे नेणे धर्माधर्म !
न दिसे नेणे सुगम !
परमार्थपंथ !! 06-08/07/05
म्हणजे, अंध माणूस अंधारात जसा चाचपडतो, तसा बद्ध मनुष्य अज्ञानाच्या अंधकारात जीवन व्यर्थ घालवतो. डोळे नसल्याने जसा अंध चारही दिशा पाहू शकत नाही तसाच ज्ञानदृष्टी नसल्याने बद्ध जीव हा परमात्म्याला जाणू शकत नाही. हा बद्ध जीव चांगले-वाईट कर्म, धर्म-अधर्म जाणत नाही. त्याचप्रमाणे साधा-सोपा, सरळ मार्ग त्याला दिसत नाही. व्यवस्थापन क्षेत्रात ह्या ओवी चपखलपणे बसतात. समर्थांनी सांगितलेला बद्ध जीव म्हणजेच व्यवस्थापन क्षेत्रातील अयोग्य कर्मचारी, कामगार, पर्यवेक्षक आणि व्यवस्थापकसुद्धा! व्यवस्थापन शास्त्रात केवळ एखाद्या विषयाची माहिती असून चालत नाही तर त्यात काळाप्रमाणे स्वतःची वृत्ती-प्रवृत्ती बदलावी लागते.
ज्या कोणत्याही कर्मचाऱयाला, कामगाराला किंवा व्यवस्थापकाला अहंकाराने पछाडलेले असेल त्याची कार्यावर श्रद्धानि÷ा राहत नाही, स्वतःच्या संस्थेविषयी आत्मीयता वाटत नाही. असे कर्मचारी किंबहुना व्यवस्थापकसुद्धा सतत तक्रार करत असतात. ते स्वतः अशांत असतात आणि संबंधित संस्थेला कलंक लावतात. उपक्रमातील प्रत्येक कृतीत नकारात्मकता शोधणे आणि सहकाऱयांचे मनोबल कमी करणे, त्यांचे खच्चीकरण करणे ह्यात हे पटाईत असतात. असे अनेक कर्मचारी हे सुरुवातीला असमाधानी असतात. ह्यांच्या असमाधानाचे रूपांतरण रागात (क्रोधात) होते, त्या क्रोधातून द्वेष उत्पन्न होतो आणि त्यानंतर सूड उगवला जातो. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की, ‘राग हे एक असे विष आहे जे मनुष्य स्वतः पितो आणि इतरांनी मरावे अशी अपेक्षा करतो!’ हा नियम प्रत्येक मनुष्यप्राण्याला लागू पडतो. म्हणून ज्याला/जिला स्वतःसहित स्वतःच्या सहकाऱयांचा, संस्थेचा आणि राष्ट्राचा विकास किंवा उत्कर्ष करायचा, साधायचा असेल त्याने डोक्मयावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवूनच वागावे. समर्थांनी अशा अशांत आणि मनोविकृत कर्मचाऱयांना सत्त्वगुण लक्षणाद्वारे दासबोधातून उत्तरे दिलेली आहेत. समर्थ म्हणतात की,
नीच उत्तर साहाणे !
प्रत्योत्तर न देणे !
आला क्रोध आवरणे !
तो सत्वगुण !!
अन्यायेवीण गांजिती !
नानापरी पिडा करिती !
तितुकेही साठवी चित्ती !
तो सत्वगुण !!
शरीरे घीस साहाणे !
दुर्जनासी मिळोन जाणे !
निंदकास उपकार करणे !
हा सत्वगुण !! 67-68-69/07/02
म्हणजे, कोणी टाकून बोलले तर सहन करणे, उलट उत्तर न देणे, राग आला तर आवरणे ह्यास सत्त्वगुण असे म्हणतात. स्वतः अन्याय केलेला नसतानाही जो इतरांकडून छळ सोसतो आणि दु:ख सहन करतो तो सत्त्वगुण आहे. इतरांसाठी जो स्वतःचा देह झिजवतो, दुर्जनांनाही आपलेसे करतो, निंदकावर उपकार करतो तो सत्त्वगुण आहे. व्यवस्थापनशास्त्रात उत्तम व्यवस्थापकास जशास तसे उत्तर न देता समर्थांनी सांगितलेल्या सत्त्वगुणांनीच वागावे लागेल. लोकांचे अपमानकारक बोलणे सहन करणे, रागावर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱयांचा त्रास सहन करतांना सहनशीलवृत्ती धारण करणे, इतरांना आपलेसे करणे, संस्थेतील दुष्प्रवृत्त लोकांना प्रगट न करणे, निंदकांवर उपकार करणे ह्या गुणांमुळे संस्थेची प्रगती होऊ शकते.
माधव किल्लेदार








