कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध गांभीर्याने घ्यावेत. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून असेच सुरू राहिल्यास पहिल्यांदाच टाळेबंदी लागू करावी लागणार असल्याचा इशारा दक्षिण कोरियाच्या आरोग्य विभागाने लोकांना दिला आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत 45 हजार 442 रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 1078 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
कोरोना संकट दीर्घकाळापर्यंत उत्तमप्रकारे हाताळण्यासाठी दक्षिण कोरियाला आदर्श देश मानले जाते. तेथील आरोग्य विभागाने विषाणूचा फैलाव रोखण्यास बऱयाच प्रमाणात यश मिळविले आहे. याकरता जागतिक आरोग्य संघटनेनेही दक्षिण कोरियाचे कौतुक केले होते.
कोरोना विषाणूचा फैलाव सर्वप्रथम होणाऱया देशांमध्ये दक्षिण कोरियाचा समावेश आहे. तरीही दक्षिण कोरियाला अन्य देशांप्रमाणे कठोर टाळेबंदी लागू करावी लागलेली नाही. याऐवजी सरकारने चाचण्या आणि ट्रेसिंगच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. परंतु हिवाळय़ात तेथील संक्रमण नियंत्रणाबाहेर जाऊ लागले आहे. तेथे कथितरित्या कोरोनाच्या तिसऱया लाटेमुळे नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सोल शहरातील लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यून ताए हो यांनी केले आहे. या शहरात देशाची निम्मी लोकसंख्या वास्तव्यास आहे. सध्या शहरात निर्बंधाची पातळी 2.5 वर आहे. पातळी 3 वर शहर पोहोचल्यास टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे.









