आदर्की :
फलटण तालुका पश्चिम भागातील आदर्की बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच व तीन सदस्यांनी निवडून आल्यानंतर वेळेत जात पडाताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने विकास काकडे यांनी केलेल्या तक्रार अर्जावरून जिल्हाधिकारी यांनी या सरपंचासह इतर तीन सदस्यांना अपात्र ठरविले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २०१७ मध्ये आदर्की बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण निहाय भागातून ९ सदस्यांची निवडणूक झाली होती. तर लोक नियुक्त सरपंच पदाची निवड १७ / १० / २०१७ रोजी झाली होती. निवडणूक निकाल घोषित घेवून 3 अनुसुचित जाती स्त्री प्रवर्गातून सरपंच म्हणून चित्रा हणमंत काकडे या निवडून आल्या होत्या तर प्रभाग तीन मधून अनुसुचित जाती स्त्री प्रवर्गातून उज्वला सदाशिव काकडे, प्रभाग दोन मधून नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून मंदा आनंदराव शेंडगे व प्रभाग १ मधून नागरीकांचा मागास प्रवर्गातून धनाजी तुकाराम खराडे हे तीन सदस्य राखीव जागावर निवडून आले होते.
शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याने निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे असते अन्यथा त्यांचे सदस्य अपात्र ठरतात. असे असताना सरपंचासह या तीन सदस्यांनी शासनाने जात पडताळणी मुदतवाढ देवूनही वेळेत प्रमाण पत्र सादर केले नाही याबाबत येथील सामाजीक कायकर्ते विकास श्रीरंग काकडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे ८ / ७ / २०१९ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची दखल घेत त्याची सुनावणी होवून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १० – १ – अ नुसार जिल्हाधिकारी यांनी . तक्रार दार यांचा अर्ज मान्य करून सरपंचासह तिन सदस्यांना अपात्र ठरवण्यात येत असल्याचा निर्णय दिला असून पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा , तहसीलदार फलटण, गट विकास अधिकारी पंचायत समिती फलटण व ग्रामपंचायत आदर्की बुद्रुक यांना प्रत रवाना केली आहे. त्यामुळे आदर्की बुद्रुक ग्रामपंचायतीचे थेट सरपंच व एकाच वेळी तीन सदस्य अपात्र ठरल्यामुळे ग्रामपंचायतीमधून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे प्रस्थापित गटाला दणका बसला आहे.









