ममता बॅनर्जी यांच्यावर उपहासात्मक टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘दीदी ओ दीदी’ म्हणण्यावर तृणमूल काँग्रेसने आक्षेप नेंदविला होता. पंतप्रधान मोदी हे ममता बॅनर्जींना दीदी ओ दीदी संबोधून थट्टा करत असल्याचा दावा तृणमूलने केला होता. तर मंगळवारी पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये झालेल्या प्रचारसभेत मोदींनी ममतांना आदरणीय दीदी असे संबोधिले आहे.
आदरणीय दीदी, ओ दीदी आम्ही तर सामान्य आहोत आणि ईश्वराच्या आज्ञेने, त्याच्या आशीर्वादाने देशसेवेत कार्यरत आहोत. ममतांना प्रतिदिन नंदीग्राममध्ये विजयी होणार असल्याचे म्हणावे लागत आहे. ममतांना टिळा लावणाऱयांपासून भगवा परिधान करणाऱयांबद्दलही राग येत आहे. यातून ममतांच्या पायाखालील जमीन सरकल्याचे स्पष्ट आहे. ममतांचा पराभव निश्चित असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
मुस्लीम मतपेढीही हातून निसटली
आदरणीय दीदींनी अलिकडेच सर्व मुस्लिमांनी एकत्र यावे, मते विभागू नका असे म्हटले होते. यातून मुस्लीम मतपेढी हातून निसटल्याची जाणीव ममता बॅनर्जींना झाल्याचे समजते. मुस्लीम तृणमूल काँग्रेसपासून दुरावल्याचे ममतांना जाहीरपणे म्हणावे लागत असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
..आमचे केसच उपटले असते
दीदी ओ दीदी तुम्ही निवडणूक आयोगाला शिव्या देत राहता. सकाळ-संध्याकाळ एकच वाक्य म्हणत राहता. ममतांनी जे म्हटले, जर आम्ही सर्व मुस्लिमांनी एकत्र व्हावे आणि भाजपला मतदान करावे असे उच्चारले असते तर निवडणूक आयोगाने आमच्यावर 8-10 दिवसांसाठी बंदीच घातली असती. विरोधकांनी आमचे केसच उपटले असते. ममतादीदी ज्यांच्या भरवशावर निवडणुकीच्या मैदानात होत्या, त्यांनाच मला वाचवा अशी गळ घालत असल्याची टीका मोदींनी केली आहे.
ममतांकडून स्वयंगोल
आदरणीय दीदी ईव्हीएमला शिव्या घालतात. निवडणूक आयोगाला शिव्या वाहतात. त्यातून त्यांचा ‘खेला’ (खेळ) संपल्याचे निश्चित झाले आहे. आदरणीय दीदी तुम्ही फुटबॉल खूप खेळता. फुटबॉलमध्ये सेल्फगोल असतो, तुम्ही निवडणुकीच्या मैदानात सेल्फ गोल केला आहे. तुमची चिडचिड, नाराजी, वर्तन हे सर्व पाहून लहान मुलं देखील तुम्ही निवडणूक हरत असल्याचे सांगू शकतो असे मोदींनी ममतांबद्दल बोलताना म्हटले आहे.
आम्ही तर सामान्य आहोत
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळत असल्याचे समजायला भाजप देव आहे का अशी विचारणा ममतादीदी सध्या करत आहेत. आदरणीय दीदी, ओ दीदी आम्ही तर सर्वसामान्य माणूस आहोत. नंदीग्राममध्ये मतदान केंद्रावर तुम्ही केलेला खेला पाहून पूर्ण देशाने तुमचा पराभव निश्चित मानला आहे. याकरता देवाला विचारण्याची गरज नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.