अध्याय दहावा
आत्मा हा शरीरापासून भिन्न आहे ही संकल्पना अध्यात्मात फार महत्त्वाची आहे. जरी मनुष्य अजाणतेपणी का होईना, स्वतःला आत्मा समजून काही वेळा बोलत असतो. जसे की माझा डोळा दुखतोय म्हणजे मी वेगळा आणि डोळा वेगळा असे तो कळत नकळत दाखवून देत असतो. तरीपण ही कल्पना त्याच्या मनात पक्की झालेली नसते म्हणून आत्मा हा शरीरापासून भिन्न कसा हे भगवंत समजावून सांगणार आहेत. आत्मा म्हणजे मन असा काहीजणांचा एक गैरसमज असतो. तो खोडून काढताना भगवंत म्हणतात, मन हे एक इंद्रिय आहे आणि ते जड आहे. आत्मा तर सूक्ष्म असतो आणि त्याला जडत्व नसल्याने मन म्हणजे आत्मा नव्हे उलट आत्म्याच्या प्रकाशामुळे मनाचे अस्तित्व उजळून निघते. म्हणजेच शरीरातून आत्मा निघून गेल्यावर इतर इंद्रियांप्रमाणे मनही आपोआप निष्क्रिय होते. पुढे भगवंत सांगतात, मीच सर्वांच्यात आत्म्याच्या रूपाने वास करत असतो.
सद्गुरु ही गोष्ट जाणून असतात म्हणून ते शिष्याची देहबुद्धी नष्ट करून देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून देतात. उद्धवाच्या सर्व शंका दूर कराव्यात म्हणून ते म्हणतात की, आत्मा म्हणजे ब्रह्मदेव असेल असे तुला वाटायची शक्मयता आहे कारण तो सर्व देवात श्रे÷ आहे. पण तो म्हणजे आत्मा नव्हे. कारण कल्पाच्या आरंभी त्या ब्रह्मदेवाला मूढपणाच होता. म्हणून तो सृष्टीची उत्पत्ती करू शकला नाही कारण त्याची बुद्धी जड होती. त्याला सावध करून मीच आत्मज्ञान दिले. त्यामुळे तो ज्ञानसंपन्न होऊन सृष्टीची उत्पत्ती करू लागला.
देवांच्याबद्दल आत्मा म्हणून समजूत करून घेशील तर लक्षात घे की, देवांचा म्हणून जितका समुदाय आहे, तो सर्व माझ्यापासूनच प्रकाश मिळविणारा आहे. सर्व प्रकाशक आणि अनादि देव आणि स्वयंप्रकाश-स्वभावी आत्मा तो मीच होय. हिरण्यगर्भाला ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह म्हणतात पण त्याहूनही आत्मा अगदी भिन्न आहे कारण हिरण्यगर्भाचाही आत्मा मीच आहे. आत्मा हा देहापेक्षा भिन्न आहे ही गोष्ट अग्नी आणि लाकडाचा दृष्टांत देऊन सांगतो. अग्नी हा लाकडामध्येच राहतो पण त्याचे अस्तित्व स्वतंत्र असते. लाकडावर लाकूड घासले की, तो प्रकट होतो आणि लागलीच त्या लाकडांना जाळून टाकतो! त्यामुळे लाकडाबरोबरच अग्नीचा जन्म होतो व लाकडाबरोबर तो नाश पावतो असा माणसाचा समज होतो. अग्नी जसा लाकडात असतो त्याप्रमाणे आत्माही देहातच असतो पण तो देह होऊन राहात नाही. तो ब्रह्मज्ञानाने प्रकाशला की लगेच माणसाची देहबुद्धी जाळून टाकतो. अग्नीला जसे लाकडामुळे जन्म मृत्यू आहेत असे वाटते तसे आत्म्यालाही देहाच्या योगानेच त्याची निरनिराळी स्वरूपे प्राप्त होतात. अग्नी हा लाकडांच्या आकाराप्रमाणे तिकोनी, वाटोळा, वाकडा आहे असाही भास होतो. त्याप्रमाणे अजन्मा, शाश्वत व अव्यय असा जो आत्मा, त्याला देहाचेच आकार, विकार, जन्म, नाश इत्यादी गोष्टी लोक उगीचच लावतात. ज्याप्रमाणे अग्नी वेगळा व लाकूड वेगळे असते त्याप्रमाणे देह वेगळा व आत्मा वेगळा असतो हे अग्नीच्या दृष्टांताने भगवंतांनी समजावून दिले. पण ते उद्धवाच्या मनाला पटले नाही. म्हणून त्याने विचारले की भगवंता, अग्नीशी लाकडाचा संयोग झाला की लाकूड पेटते हे समजले. परंतु तू म्हणतोस तसे आत्मा हा मूळचाच नित्यसिद्ध आणि स्वतंत्र आहे. मग तो देहाबरोबर कसा राहू शकतो आणि सुखदुःख कसे अनुभवतो?
उत्तरादाखल भगवंत म्हणाले, आत्म्याला देहाचा संग घडतो हा समजच मुळी खोटा आहे. असा समज का होतो तेही सांगतो. जीवाने संसारात पडावे आणि भ्रम वाढवावा अशा अनेक कार्याकरिता ईश्वराने मायेला निर्माण केले आणि माया ईश्वराच्या आधीन आहे. जिवाच्या रूपाने मायेमध्ये ईश्वराचे चैतन्य प्रतिबिंबित झाले आहे. ज्याप्रमाणे डबक्मयात चंद्राचे प्रतिबिंब दिसले की, चंद्र पाण्यात बुडाला असा समज होतो. पण चंद्र आकाशामध्ये अलिप्तच असतो. त्याप्रमाणे जिवात्माही शरीरापासून निराळा असतो.








