स्वत:विषयी जाणवणारा दृढविश्वास म्हणजेच ‘आत्मविश्वास’. आत्मविश्वास मूलत: स्वभावात असतोच; तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो.
खरं तर आत्मविश्वास ही स्वत:च्या विचारांची प्रतिक्रिया असते. एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बऱयाचदा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचारांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि क्षमता असून केवळ आत्मविश्वास गमावल्याने काही व्यक्ती अपयशाच्या बळी ठरतात.
आपल्या यश मिळविण्यासाठीच्या मार्गावर व प्रयत्नात मन आपला भागीदार असतो. यात मनाची कार्ये, ध्येयाचे महत्त्व, आराखडा, कल्पनाशक्तीचा वापर, भावनांवर नियंत्रण असे निरनिराळे मुद्दे आपण अभ्यासले. आपण जे ध्येय निश्चित केले आहे, त्यावर ठाम राहून, इतर लक्ष विचलित करणाऱया गोष्टींपासून कसे दूर राहावे, त्याचाही विचार केला. तरीही, काही वेळा, काही प्रसंगांत आपल्या ध्येयाविषयी व ते गाठण्याविषयी काही शंका आपल्या मनात येतात व आपण मनाने डगमगू लागतो. त्यातून काळजी, भीती, शंका यामुळे आपल्या मनात अनिश्चितता निर्माण होते. यावर उपाय म्हणजे, आत्मविश्वास.
आपण ठरवलेल्या ध्येयावर आपण ठाम राहाणे, ती गोष्ट प्रत्यक्षात येईल व त्या दृष्टीने तुमची योजना आहे व तुम्ही ती प्रयत्नपूर्वक राबवत आहात, तर मनाची जी अवस्था तुम्हाला ते करायला भाग पाडते, ती म्हणजे आत्मविश्वास! तुमचाच तुमच्या ध्येयावर विश्वास नसेल तर दुसरा कसा ठेवेल? तुम्हाला विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही, तुमची एकाग्रता राहणार नाही. दुसरे तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार तुम्ही करत बसाल, त्याचा तुम्हाला राग येईल, दु:ख होईल. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे, तुम्ही आत्मविश्वास बाळगणे.
आत्मविश्वास असल्यावर तुम्हाला बरोबर वाटणारी, तुम्ही ठरवलेली गोष्टच तुम्ही करता. तुम्ही काही जोखीम उचलून जास्तीचे काम करायला तयार होता. तुमच्या चुका मान्य करून दुसऱयाकडून शिकायची तयारी ठेवता. मेहनत करून यश मिळवताना कौतुकास पात्र होता व यश सर्व संबंधितांना घेऊन साजरेही करता.
एकदा ध्येय निश्चित केल्यावर, त्याचा आराखडा तयार केल्यावर परत-परत त्यावर शंका न घेता, अपयशाची तयारी ठेवून, आपल्या ध्येयाप्रति काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक माहिती व ज्ञान मिळविल्याने आत्मविश्वास वाढतो. ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट करून बघितल्याने आत्मविश्वास वाढतो. तुमची तयारी व रणनीती विचार व अभ्यास करून केलेली असेल, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो.
विचारांमध्येच आत्मविश्वासाचा स्रोत दडलेला असतो. आत्मविश्वासामध्ये अशक्मय ते शक्मय करण्याची प्रचंड शक्ती असते. आत्मविश्वासामध्ये स्वप्न साकार करण्याची स्वयंप्रेरणा असते. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रयत्नांमधूनच आत्मविश्वास जाणवत असतो.
बऱयाचदा खूप मेहनत आणि नियोजन करूनही ‘यश मिळालं नाही तर..’, ‘हातून चूक झाली तर..’, ‘नीट जमलं नाही तर..’ या नकारात्मक विचारांमुळे मनात भीती आणि गोंधळ सतत वाढत असतो. त्यामुळे आत्मविश्वास मिळविण्यासाठी मूलत: योग्य पद्धतीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा.
विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वत:कडे, वास्तवाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं ‘कसं’ आणि ‘का’ ठरलं की, आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होत जातो.
आत्मविश्वास म्हणजेच जगण्याचं मनोबल. आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातला आनंद. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची ऊर्जा. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची उमेद!