प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी फेरिवाल्यांकरिता आत्मनिर्भर योजनेंतर्गत अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. याकरिता महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. रस्त्याशेजारी व्यवसाय करणाऱयांची माहिती घेण्यात येत आहे.
शहरात अडीच हजारहून अधिक फेरीवाले आहेत. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेंतर्गत केवळ 1500 फेरीवाल्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित फेरीवाल्यांनी महापालिकेकडे नोंदणी करून योजनेचा लाभ घेतला नाही. त्यामुळे ही योजना काटेकोरपणे राबवून फेरीवाल्यांना योजनेची माहिती द्यावी, अशी सूचना केंद्र शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येत आहे.
शहर व उपनगरात रस्त्याशेजारी बसून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत लाभ घेतला आहे का, याची विचारणा करण्यात येत आहे. योजनेकरिता अर्ज न केल्यास त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेण्यात येत आहे. ही सर्वेक्षण मोहीम सलग तीन दिवस चालणार आहे. मंगळवारपासून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. बाजारपेठेसह उपनगरात फेरीवाल्यांकडून माहिती घेण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या कर्मचाऱयांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









