भारतीय पेट्रोलियम संस्था (आयआयपी) ने एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली आहे. या संस्थेने दहा वर्षे प्रयत्न करून विमान उडविणारे जैवइंधन विकसित केले आहे. या इंधनाला आता मान्यता मिळाली असून लवकरच त्याचा उपयोग करून भारतीय वायु सेना लढाऊ विमान आकाशात उडविणार आहे.

जैवइंधनावर विमान उडविण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असेल. या इंधनाचे परीक्षण आणि प्रमाणीकरण केंद्र सरकारच्या चाचणी संस्थेने अनेक वेळा केले आहे. हे इंधन विमान उडविण्यास अत्यंत सक्षम असल्याचा निर्वाळा या संस्थेने दिला आहे. या संस्थेकडून गुरुवारी हे प्रमाणपत्र भारतीय वायु दलाला देण्यात आले आहे. या इंधनाचा उपयोग करून विमाने उडविण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. 27 ऑगस्ट 2018 या दिवशी स्पाईस जेट या कंपनीचे एक विमान या इंधनाचा वापर करून यशस्वीरीत्या उडविण्यात आले होते. एका रशियन विमानातही या इंधनाचा यशस्वी उपयोग करण्यात आला आहे.
आता या इंधनाला आंतरराष्ट्रीय संमती मिळविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टींग अँड मटेरियल या जागतिक दर्जाच्या संस्थेकडे या इंधनाचे नमुने पाठविण्यात आले असून तेथे परीक्षण केले जात आहे. या इंधनाचे संशोधक डॉ. अंजन रे यांच्या माहितीनुसार अमेरिकेत परीक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. या इंधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यास भारत त्याची निर्यातही करू शकणार आहे. अशाप्रकारे विमान इंधनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दृष्टीने भारताने भरारी घेतली आहे.









