प्रतिनिधी / मडगाव
कोरोनामुळे मृत्यू येणाऱया व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना ते मर्यादित स्वरूपात करावे अशी मार्गदर्शन तत्वे घातली असताना देखील काही ठिकाणी अंत्यसंस्काराला लोकांची गर्दी होत असल्याने स्मशानभूमीत पोलीस तैनात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुधवारी मडगावच्या मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू आलेल्या एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्याच्यावेळी लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावल्याने, धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मोठय़ा संख्येने उपस्थिती लावताना मास्क न वापरणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे तसेच मयत व्यक्तीच्या जवळ जाणे म्हणजेच कोरोनाला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती असल्याने त्याची गंभीर दखल घेण्याची पाळी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेली आहे.
खारेबांध येथील एका महिलेचे गेल्या दोन दिवसांमागे कोरोनामुळे निधन झाले होते. तिच्यावर काल संध्याकाळी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी खारेबांध परिसरातील लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. त्यात तिच्या जवळच्या नातेवाईकांने शववाहिकेत चढून तिचे अंत्यदर्शन घेतले. या महिलेचा मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळून पाठविला होता. तरी सुद्धा तिचा चेहरा खुला करून अंत्यदर्शन घेण्याचा प्रकार घडला.
मयत महिलेचे अंत्यदर्शन घेण्यासाठी झालेली गर्दी नक्कीच सरकारी यंत्रणेची झोप उडविणारी होती. एका बाजूने कोरोनाचा उद्रेक झालेला असताना लोकांनी अशी गर्दी करणे म्हणजे धोक्याची घंटा मानली जात आहे. या पूर्वी देखील एक-दोन वेळा असाच प्रकार घडला असून आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयातून स्मशानभूमीत पोलीस तैनात करण्याचा आदेश निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









