गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर : सोशल मीडियावर गणरायांच्या आगमनाची धूम : फेसबुक-व्हॉट्सऍपवर गणेशाच्या आगमनाचे नानाविध मेसेज
प्रतिनिधी /बेळगाव
गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात आणि गणेशाच्या आगमनासाठी आपण कोणकोणती तयारी केली पाहिजे या विचारात आता शहरवासियांना वेध लागले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनाचे…! अवघ्या महिन्यावर गणेशचतुर्थी येऊन ठेपली आहे. मात्र, आतापासूनच सोशल मीडियावर गणेशाच्या आतुरतेचे मेसेज टाकण्यास सुरुवात झाली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर गणेशाच्या आगमनाबद्दलचे नानाविध मेसेज टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आतापासूनच गणेशाच्या स्वागतासाठी सारेच गुंतल्याचे दिसते.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाही बाप्पांच्या आगमनाची तयारी गणेशभक्त आतापासून करू लागले आहेत. श्रीमूर्ती मातीचीच असावी, असा प्रशासनाचा दंडक आणि कोरोनाचे सावट अशा विवंचनेत मागील वषीचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आताही सरकारने मार्गसूची जाहीर केली आहे. त्यामुळे यावषीचा गणेशोत्सवही साधेपणाने होणार आहे. प्रशासनाच्या लांबलेल्या निर्णयामुळे अनेक गणेशभक्तांतून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटींमुळे अनेक गणेशमूर्ती बनविणाऱया कलाकारांवर संकट कोसळले. ते संकट कायम राहणार की काय अशी भीती असतानाच अनेक ठिकाणी मातीच्या मूर्ती बनवून भाविकांची सोय करण्यातच मूर्तिकारांनी धन्यता मानली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते, हा मुद्दा पुढे करून प्रशासनाने अशा मूर्तींवर टाच आणली. यामुळे मूर्तिकारांचा व्यवसाय अडचणीत आला. सध्या शहरात मातीच्या गणपती मूर्तींचे आगमन होऊ लागले असून त्यावर मूर्तिकारांनी हात फिरविण्यास सुरुवात केली. अवघ्या महिन्यावर गणेशचतुर्थी येऊन ठेपली आहे. यामुळे सारेच मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात पाहावयास मिळते. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक तरुणांनी आतापासूनच आतुरता तुझ्या आगमनाची, गणपती बाप्पा मोरया यासह अनेकांच्या डीपीही आता बदलू लागल्या आहेत. घरात कोणती सजावट करायची, काय करायचे, या विचारात येथील युवावर्ग दिसत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही मूर्तिकार विविध स्वरुपातील मूर्ती साकारण्यात गुंतले असून सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीही करण्यास प्रारंभ केला आहे. विशेषतः मातीच्या मूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांचा अधिक कल आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आतापासूनच गणरायांच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागून राहिल्याचे चित्र पाहावयास मिळते. बेळगावात गणेशचतुर्थी ही पुणे आणि मुंबईच्या पार्श्वभूमीवर साजरी केली जाते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या एकच धूम आणि पेझ सुरू आहे ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची.
प्लास्टर ऑफ पॅरिसवर निर्बंध, तरीही…
यावषी आपण गणपती मोठय़ा आनंदात आणि उत्साहात आणणार, तर काही जण आपण पारंपरिक गणेशाच्या आगमनाची तयारी करत असल्याचे मेसेज सध्या व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर फिरत आहेत. काही जण आपण धुमधडाक्मयात आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी आतुरलेले आहोत, अशी उल्हासदायी वाट पाहणाऱयांनीही काहीसे मेसेज सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यामुळे यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसवर निर्बंध आणला असला तरी भक्तांच्या मनावर निर्बंध प्रशासन कसे आणणार? असे जाणकारांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांच्या फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर विविध मेसेज आगमनाचे दिसून येत आहेत.
पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर बेळगावात या काळात ढोलताशांचा आवाज घुमतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे पारंपरिक वाद्यांबरोबरच डॉल्बीवरही बंदी घातली आहे. कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असा आदेश काढण्यात आला. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्या नियमांचे पालन करावे, असेही असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे यावषीच्याही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आहे. मात्र, सोशल मीडियावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा सुरू असून आतापासूनच गणेशभक्त तयारीला लागले आहेत.









