एखाद्या महामार्गावरून ज्या सहजपणे कार चालविता येते, तशाच सुखावह पद्धतीने ती आकाशातून चालविता यावी, हे स्वप्न माणसाने अनेक दशकांपासून पाहिले आहे. विमानाचा शोध लागून आता 120 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. चालकरहित ड्रोन विमानेही आता नवी राहिलेली नाहीत. याच संशोधनाची पुढील सुधारित आवृत्ती चालकरहित ‘उडती कार’ ही आहे. मात्र, आता हे स्वप्न साकार झाले असून लवकरच अशा कार्स आकाशातून उडत जाताना आपण पहाणार आहोत. आपल्यापैकी काही अशा कारचे मालकही होऊ शकतील.
ऑस्ट्रेलियातील महानगर सिडनी येथे अशा कारचे यशस्वी उड्डाण करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत असे अनेक प्रयोग करण्यात येणार असून सुरक्षितता आणि वेग यांच्या दृष्टीने ते सफल झाल्यास अशा कार्सचे व्यापारी उत्पादन ही केवळ काही वर्षांच्या प्रतीक्षेची बाब राहील असे सांगण्यात आले आहे.
अशा कार्सची एक शर्यत या वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्यात आली आहे. ऍडिलेड येथील अलाऊडा एरॉनॉटिक्सचे संस्थापक मॅट पिअरसन यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली. चालकरहित कार्सची उड्डाणे यशस्वी झाली असून लवकरच त्यांच्या शर्यतीची योजना आखली जात आहे. या चालकरहित उडणाऱया कार्स अतिशय सुरक्षित असून वेगवान आहेत. रस्त्यावर असतात तशी बंधने आकाशात त्यांच्यावर असणार नाहीत. त्या अधिक वेगाने प्रवास करू शकतील. त्यांची शर्यत यशस्वी झाल्यानंतर त्यांची बाजारात विक्रीही करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.









