‘तरुण भारत’ कार्यालयात जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची भिमगर्जना : दिलखुलास गप्पांचा रंगला फड
विशेष प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याची केवळ अंधश्रद्धा आहे. विशेषतः माध्यमांनी ती जास्त पसरवली. निम्मा जिल्हा सुद्धा त्यांच्या ताब्यात नाही. खरं तर राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून सातारा जिल्हा मागे पडला, राष्ट्रवादीने तो नासवला. पवारांनी पुण्याकडे लक्ष देताना साताऱयाला कायमच नरकयातना दिल्या. जिल्हय़ाला गतवैभव देण्याची क्षमता केवळ भाजपामध्ये आहे. पक्षाचा आमदार म्हणून काम करत होतोच, पण आता पक्षाकडे न मागता माझ्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राजकीय अंधश्रद्धेचे निर्मुलन करुन आता सातारा भाजपाचा बालेकिल्ला होईल, अशी भिमगर्जना नूतन जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी ‘तरुण भारत’ सातारा कार्यालयात दिलेल्या भेटीदरम्यान केली.
माण-खटावचे तिसऱ्यांदा आमदार झालेले जयकुमार हे आक्रमक राजकारणी समजले जातात. भाजपाने त्यांना अचानक जिल्हाध्यक्षपद देऊन त्यांचा जणू गौरव केला आहे. जिल्हय़ाचा सत्कार, पत्रकार परिषद यानंतर पहिल्यांदाच ‘तरुण भारत’ भेटीदरम्यान त्यांचा आवेश कमी नव्हता, उलट गेल्या 12 वर्षातील राजकीय जीवनासंदर्भात यानिमित्ताने गप्पांचा चांगलाच फड रंगला. यावेळी त्यांच्या पत्नी सोनिया गोरे उपस्थित होत्या.
●भाजपाने जिल्हाध्यक्ष पद देताना तुमची आक्रमकता, मास लिडरशिप पाहिली की, तुम्ही निवडून आणलेल्या खासदाराबद्दल हा मान मिळाला?
-या पक्षात मागून काही मिळत नाही आणि दिलेला आदेश मोडता येत नाही. मी नको म्हणत असतानाही पक्षाने मला पद दिले. मी जिल्हय़ातील सर्व नेत्यांची चर्चा केली तर त्यांनीही उत्साह दाखवला. त्यामुळे मला हे पद स्वीकारावे लागले. पक्षाने दिलेली जबाबदारी मला आता सार्थ करायची आहे.
●जे काँग्रेसने दिले नाही ते भाजपने कसे दिले?
-भाजपामध्ये केवळ गुणवत्तेला प्राधान्य आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. तुम्ही म्हणला ते खरं आहे. माझ्यावर आजही पतंगराव साहेबांचा प्रभाव असला तरी पृथ्वीराज बाबांचा कधीच प्रभाव नव्हता. ते केवळ नेते होते. आज फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे शिकायला मिळाले ते काँग्रेसमध्ये असतो तर 50 वर्षे शिकता आले नसते.
●सध्या जिल्हय़ात टेक्निकली पक्षात अन् मनाने बाहेर असे काही आमदार आहेत त्यांचे काय करणार?
-हे खरं असलं तरी भाजपामध्ये जे आहेत ते पूर्णतः भाजपाबरोबरच राहीतल याची जबाबदारी त्यांच्यावतीने मी घेतली आहे. (शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता). तर काही जण शिवसेनेमध्ये तांत्रिकदृष्टय़ा आहेत मात्र त्यांची कार्यप्रणाली पूर्णतः भाजपाची व लोकांकरिता आहे, अशांना पक्ष म्हणून मी दुजाभाव देणार नाही. असे सूचक वक्तव्य त्यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता केले.
●पूर्वी जिल्हाध्यक्षाची स्पर्धा तुम्ही आनंदराव नानांबरोबर केली आता पुन्हा एका पक्षात आहात तर स्पर्धा पुन्हा होणार का? -नानांशी स्पर्धा नव्हती आणि तो काळ काँग्रेसमधला होता. आता तो काळ नाही आणि ते संस्कारही नाहीत. भाजपामध्ये असल्या स्पर्धांना थारा नसतो. आणि कित्येक महिने झाले नाना हायत कुठं चाललंय काय हे विचारण्याची गरज मला तर पडली नाही.
●नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनावर काय सांगाल?
-सरतं अधिवेशन हे सुरुवातीपासून कालपर्यंत फडणवीसांच्या भोवती फिरत होतं. सत्ता स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत फडणवीसांनी आम्हाला विरोधी पक्षात आहोत हे कधीच जाणवू दिलं नाही. याही अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक आणि सत्ताधारी भेदरलेल्या मांजरासारखे होते. विरोधी पक्ष कसा असावा याचे यानिमित्ताने देशात उदाहरण झाले.
राज्यातील तिघाडी सरकार म्हणजे तीन अधाशी माणसांपुढे मांडून ठेवलेले जेवणाचे ताट आहे. ओरबाडून ते संपत नाही तोपर्यंत हे तिन्ही अधाशी एकमेकाला बांधून राहणार. या अधाशांचा काळ आता संपलाय, असेही ते म्हणाले.
दोन्ही महाराज सोबत आहेत
दोन्ही महाराज ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहात, त्यांना काय शिकवण देणार? यावर ते म्हणाले, मी जरी अध्यक्ष असलो तरी मी कोणाच्या वर नाही आणि कोण माझ्या खाली नाही. आम्ही सगळे सोबत आहोत. जिल्हाध्यक्ष होताना त्या दोघांनी उत्साहाने संमती दर्शवली होती. त्या दोघांना सोबत घेऊन सातारा जिल्हा भाजपाचाच बालेकिल्ला राहील हा मी पुन्हा तुम्हाला शब्द देतो.
उदयनराजे तेंव्हा राष्ट्रवादीत होते
पक्ष-बिक्ष गेला खड्डय़ात म्हणणाऱ्या उदयनराजेंना कसे सोबत घेणार यावर ते म्हणाले, ते बेधडक आहेत. ते विधान त्यांनी राष्ट्रवादीत असताना केले होते. ते त्या पक्षात असतानाही फडणवीसांनी त्यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्यात हे विसरु नका.
रामराजेंना हाकलायची वेळ आलीय
रामराजे आणि जयकुमार हे द्वंद कायम ठसठसलेलं. त्यामुळे अजितदादांनी रामराजेंना लोकसभेत पहायचे आहे या विधानावर प्रश्न विचारला असता जयाभाऊंनी शब्दांचे फटकारे चालवले. त्यांना लोकसभेत पहायचे आहे, असं दादा का म्हणाले, याचा दुसरा अर्थ पहा. लोकसभेत पहायचे म्हणजे, सभापती म्हणून ठेवायचे नाही, आणि राज्यसभेवरही घ्यायचं नाही, हे अजितदादांनी स्पष्ट केले. लोकसभेत पहायचय याचा अर्थ राष्ट्रवादीतून त्यांना हाकलून द्यायची वेळ आलीय. थोडक्यात पक्षाला त्यांचा रिचार्ज संपलाय.
किसनवीर : सहकारात मी फारसे लक्ष घालत नाही
सध्या अडचणीत आणि निवडणुकीच्या कचाटय़ात अडकलेल्या किसनवीर वरुन भाजपाचे सदस्य असलेल्या मदनदादा भोसले यांच्याबाबत छेडले असता जयकुमार गोरे यांच्या चेहऱयावर एक वेगळेच हसू दिसले. प्रश्न थेट मदनदादांबद्दल होता तो टाळून किसनवीरबाबत ‘तरुण भारत’कडूनच अधिक माहिती घेतली. निवडणुकीत काय होणार हे मदन भोसलेच सांगू शकतात. कारण ऊस कारखानदार आणि सहकार याबाबत मला फारशी माहिती नाही. मला त्याचा अभ्यास करावा लागेल, असे त्यांनी पिल्लू सोडले.