दूषित पाणी, अस्वच्छता, बदलते वातावरण कारणीभूत शहर परिसरात विविध रोगांनी काढले डोकेवर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीची दुसरी लाट अनेकांच्या उद्योग-व्यवसायांवर अवकळा आणणारी ठरली. यात अनेक कोरोनाबाधितांनी आपले जीव गमावले आहेत. अशा परिस्थितीत आता संसर्गजन्य आजारांचा फैलावही वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून आजारांतून सुटका कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक भागात अपुरा पाणी पुरवठा, दूषित पाणी, पाऊस सुरू झाल्याने बदलते वातावरण आदी कारणांमुळे शहर आणि परिसरात विविध संसर्गजन्य रोगांनी डोकेवर काढले आहे. यामुळे काही भागात डेंग्यू आणि इतर रोग फैलावत आहेत. काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीतच कोरोना महामारीमुळे सारेजण भयभीत झाले आहेत. शहर व उपनगरी भागात स्वच्छतेचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी शहर परिसराचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे असताना आरोग्य खात्याने डोळय़ांवर पट्टी बांधून घेतली आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
ड्रेनेज तुंबण्याचे प्रकारही वाढीस
पावसाची जोरदार सलामी असली तरी 5 ते 7 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोडण्यात येणाऱया पाण्यामध्ये ड्रेनेज व गटारींचे पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे, असा आरोप नागरिकांतून होत आहे. शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. ड्रेनेजचे पाणी विहिरींमध्ये जात असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोनामुळे आधीच आरोग्य खात्यावर पडलेला ताण आणि त्यातच आता वाढणारे संसर्गजन्य रोग यामुळे आरोग्य खात्यानेही हात टेकले आहेत. अनेक रोग नियंत्रणात येत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
डेंग्यूचे रुग्ण वाढले
बेळगाव शहर व जिल्हय़ात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केवळ आठवडाभरात अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. दूषित पाणी, अनेक दिवस साठवून ठेवावे लागत असलेले पाणी आणि बदलणारे वातावरण यामुळे संसर्गजन्य रोगात वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरासह उपनगरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली असताना याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
यावषी पावसाने सुरुवातीलाच झोडपून काढले आहे. जोरदार पावसाने हजेरी लावली तर रोगराई नष्ट होते, असे सांगण्यात येते. मात्र, इतर आजार वाढत असल्याने आता असे सांगणेही चुकीचे ठरू लागले आहे. अनेकजण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून काहीजण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. आरोग्य खात्याने सातत्याने पाणी गरम करून प्यावे, असा सल्ला दिला आहे. मात्र, काहीजण आरोग्य खात्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून समस्या ओढवून घेत असल्याचेही दिसून येत
आहे.









