कोरोनाची जागतिक पातळीवर पसरलेली महामारी ध्यानात घेता, अमेरिका व चीन या जागतिक महासत्ता आपापसातील मतभेद बाजूस सारून एकत्रितपणे या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती. पण आपत्तीतही स्वार्थ आणि विघ्नात संतोष शोधण्याची प्रवृत्ती जापोसणाऱया या महासत्तांनी ‘हम नही सुधरेंगे’ हेच धोरण कायम ठेवल्याचे त्यांच्या परस्परांवरील ‘चिखलफेक’ खेळावरून दिसून येत आहे. कोरोनाने ग्रासलेल्या जगासाठीही जितकी निराशजनक तितकीच संतापजनक बाब आहे. बेजबाबदार व तथ्यहीन वक्तव्ये करण्याचा विक्रम करणाऱया अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीसच कोरोना विषाणूस ‘वुहान विषाणू’ असे संबोधून चीनला डिवचले. यानंतर चिनी सूत्रांनी अमेरिकन लष्करी तुकडय़ांनी हा विषाणू वुहान प्रांतात आणला याबाबत कटकारस्थान कथा पसरवण्यास सुरुवात केली. एका बाजूला कोरोना साथीने लोक पटापट मरत असताना आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळून आपले राजकारण पुढे दामटण्याचा हा प्रयत्न उभय देशातील काही शहाण्या माणसांच्या ध्यानात येताच त्यांनी, सध्या सारे आरोप व दूषणे बाजूस सारून आपण कोरोना आजाराचा सामना करणे अधिक औचित्याचे ठरेल हे धोरण वरि÷ नेतृत्वाला पटवून दिले. यामुळे गेल्या आठवडय़ात काही काळ दोन्ही महासत्तात समन्वयाचे व सहकार्याचे धोरण दिसून आले. चीनमधील विषाणू संसर्गाची लाट काहीशी कमी होऊन कोरोनाने आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवला आणि पाहता पाहता हजारांच्यासंख्येने अमेरिकन्स विषाणू बाधीत होऊ लागले व मरू लागले. अशा आणीबाणीच्या स्थितीत चीनने अमेरिकेस ‘मास्क’ व इतर प्रतिबंधक साहित्याचा पुरवठा केला. वैद्यकीय साधनांचा अमेरिकेत आत्यंतिक तुटवडा असण्याच्या या काळात मास्कच्या एकूण आयातीपैकी अर्धी आयात अमेरिकेने चीनकडून केली. ट्रम्प आणि जिनपिंग यांचे या काळात परस्पर सहकार्याबाबत बोलणेही झाले. या परिस्थितीवरून तरी आता कोरोनाची जीवघेणी साथ संपेपर्यंत उभय महासत्तात काही संघर्ष उभा राहणार नाही असे वाटत होते. परंतु या आशावादालाही अखेर चुड लागून ‘येरे माझ्या मागल्या’ चा फेरा दोन्ही देशात पुन्हा सुरू झाला आहे.
यावेळी फरक इतकाच की ‘जागतिक आरोग्य संघटना’ हा तिसरा खेळाडू या संघर्षाचा भाग झाला आहे. ही संघटना संयुक्त राष्ट्र संघाचे (युनो) एक महत्त्वपूर्ण अंग असून, जागतिक आरोग्य सुरक्षेसंदर्भात आजपर्यंत ही संघटना अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या जागतिक पातळीवरील संघटनेवरच तोफ डागल्याने व तिच्या निधीत कपात करण्याचे जाहीर केल्याने आपोआप या आणीबाणीच्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी केलेल्या आपल्या वक्तव्यात ट्रम्प यांनी ‘जागतिक आरोग्य संघटना’ ही चीन धार्जिणी बनली असून कोरोना विषाणूबाबत जागृती करण्यात तिने विलंब लावला असा आरोप केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी चीनच्या कोरोना विषाणूबाबतच्या पारदर्शकतेची व प्रयत्नांची जाहीर प्रशंसा केली होती, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे वक्तव्य बरेच खळबळजनक ठरले. तसे पाहता आंतरराष्ट्रीय संघटनांबाबत बेलगाम मुक्ताफळे उधळणे ही ट्रम्प यांची ही काही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी काहीच महिन्यापूर्वी त्यानी जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्था कालबाहय़ झाल्या आहेत असे तारे तोडले होते. त्याआधी जागतिक तापमान वाढ हा मुद्दाच नाही म्हणत पर्यावरणीय संघटनांना अडचणीत आणले होते. तथापि, सांप्रतकालीन गंभीर परिस्थितीत तरी ते किमान शहाणपण शाबूत ठेवतील अशी अपेक्षा होती ती ताज्या बेजबाबदार वक्तव्याने उधळून लावली आहे. इतिहास आणि ट्रम्प यांचे जागतिक आरोग्य संघटनेवरील ताशेरे यातील प्रमुख विरोधाभास हा की, दुसऱया महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत हा संघ अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली कार्यरत असून अमेरिकेच्या इतर देशातील आगळीकी व हस्तक्षेप याकडे दुर्लक्ष करणारा आहे अशी त्याची जगभरात प्रतिमा होती. संयुक्त राष्ट्रसंघाचे दशकभर कार्यरत असलेले माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्र संघावरील अमेरिकन प्रभावाची व हस्तक्षेपाची वारंवार जाहीर निंदाही केली होती. अशा स्थितीत आज याच अमेरिकेचे अध्यक्ष जागतिक आरोग्य संघटना चीनधार्जिणी बनली आहे असे का म्हणत आहेत याची कारणेही शोधली पाहिजेत.
अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण 20 जानेवारीस आढळून आला. त्यानंतर, ट्रम्प यांनी तो चीनवरून आला होता व सारे काही नियंत्रणात आहे असे जाहीर केले. जानेवारी 25 च्या दरम्यान, चीनचे कोरोनाची साथ आटोक्मयात आणण्याबाबतचे प्रयत्न व पारदर्शकता याबाबत त्यानी प्रशंसा केली. गुप्तचर खात्याने वारंवार जागे करण्याची प्रयत्न करूनही ट्रम्प यांनी संपूर्ण जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात त्या इशाऱयांकडे दुर्लक्ष केले. विदेशी नागरिकांना अमेरिका बंदी केल्यानंतर मार्चच्या मध्यापर्यंत या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारपर्यंत गेली तरीही ट्रम्प यांनी परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात असल्याचे दावे सुरूच ठेवले होते. परंतु कोरोनाबाधीत मृत्यूची संख्या जसजशी तेरा हजाराहून अधिक दिसू लागली तशी ट्रम्प यांची या साथीसंदर्भातील ढिलाई, बेपर्वाई उघडय़ावर पडू लागली.
अमेरिकेतील नागरिक, संस्था, माध्यमे यांचे एकच टीकास्त्र त्यांना नेहमीप्रमाणे या अरिष्टाचे खापर जागतिक आरोग्य संघटनेवर फोडले आहे. दुसरीकडे आपल्याच देशातील साथीवर उपाय शोधण्यात अमेरिकेची त्रेधा उडत असताना चीनने 100 देशांना वैद्यकीय मदतीचा पुरवठा करून अमेरिकेच्या पारंपरिक जागतिक नेतृत्वास आव्हान दिल्याने ट्रम्प महाशय संतापले आहेत.
आज वास्तव हे आहे की डिसेंबरच्या मध्यात वुहानमधील कोरोनाची साथ, त्यात झालेले मृत्यू, साथीची व्याप्ती व भयावहता याबाबत माहिती लपविणे आणि इतर जगात साथीचा प्रादुर्भाव होऊ देणे यासाठी चीन जबाबदार आहे. ही भयावहता व कोरोनाची विध्वसंक शक्ती जाणून जगास वेळीस सावध न करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटना जबाबदार आहे. बरीच माहिती व गुप्तचर खात्याने इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अमेरिका जबाबदार आहे. अशा स्थितीत परस्परावर दोषारोप न करता एकजुटीने कोरोनास जगातून हद्दपार करणे आणि त्यानंतर या साथीचे मूळ शोधणे हेच शहाणपणाचे ठरणार आहे.
अनिल आजगावकर, मोबा.9480275418








