आधारकार्डच्या धर्तीवर नोंद, संपूर्ण माहिती मिळविणार ऑनलाईन
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र शासनाच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत सर्व पाळीव जनावरांच्या कानांना बारा अंकी नंबरचा टॅग (नोंदणी क्रमांक) लावला जात आहे. पहिल्या टप्प्यात केवळ दुधाळ जनावरांना टॅग लावण्यात आला आहे. मात्र आता शेळय़ा-मेंढय़ांना देखील हा टॅग लावला जाणार आहे. त्यामुळे लवकरच जिल्हय़ातील 14 लाख शेळय़ा-मेंढय़ांच्या कानांवर टॅग दिसणार आहे.
संपूर्ण पशुधनाची ओळख निर्माण करण्यासाठी ही अभिनव योजना खात्यामार्फत राबविली जात आहे. हा टॅग लावल्यानंतर जनावरांचे वय, उंची, आहार याविषयी सर्व माहिती ‘इनाफ’ या सॉफ्टवेअर संग्रहित केली जाणार आहे. शिवाय आधारकार्डच्या धर्तीवर शेळय़ा मेंढय़ांना युनिक आयडी दिली जाणार आहे. टॅग लावलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपलोड केली जाणार आहे.
या टॅगमुळे जनावरांची खरेदी-विक्री, प्रजनन क्षमता, रोगप्रतिबंधक लसी, लागणारा औषध पुरवठा या सर्व बाबींची नोंद ठेवण्यास पशुसंगोपनला मदत होणार आहे. सर्व दुधाळ जनावरांबरोबर शेळय़ा-मेंढय़ांना देखील टॅग लावणे बंधनकारक असून टॅग लावून घ्यावेत, असे आवाहन खात्याने केले आहे.
टॅग लावल्यामुळे एकूण जनावरांची संख्या, त्यापैकी दुभती जनावरे किती, कुणाच्या मालकीची आहे, त्याची उत्पादन क्षमता किती, कुठल्या भागातले आहे, कोणत्या जातीचे आहे यासंबंधी सर्व माहिती एकत्रितपणे ऑनलाईनद्वारे मिळणार आहे. एकंदरीत जनावरांची ओळख पटण्यास हा टॅग महत्वाचा ठरणार आहे. जिल्हय़ात 7 लाख 80 हजार बकरी तर 6 लाख 20 हजार मेंढय़ा आहेत. या सर्व शेळय़ा-मेंढय़ांना टॅग लावला जाणार आहे. शेळय़ा-मेंढय़ांच्या कानावरील बारा अंकी टॅगवरून संपूर्ण माहिती खात्याला मिळणार आहे. तसेच अचानक शेळय़ा-मेंढय़ा दगावल्यास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी हा टॅग महत्वाचा ठरणार आहे.
खात्यामार्फत शेळय़ा-मेंढय़ांना प्रतिबंधक लसीकरण केले जाते. संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी लसीकरण मोहीम राबविली जाते. अशावेळी हा बारा अंकी नंबरचा युनिक आयडी उपयोगी पडणार आहे.
डॉ. अशोक कोळ्ळा-(उपनिर्देशक पशुसंगोपन खाते, बेळगाव)
मागील काही वर्षांपासून पाळीव दुभत्या जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे. मात्र पशुपालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. दुभत्या गायी, म्हशींबरोबर शेळय़ा-मेंढय़ांच्या कानांवर देखील बारा अंकी टॅग लावला जात आहे. यामुळे संपूर्ण पशुधनाची ओळख होण्यास मदत होणार आहे.
जिल्हय़ातील एकूण तालुकानिहाय शेळय़ा-मेंढय़ांची संख्या
| तालुके | शेळय़ांची संख्या | मेढय़ांची संख्या |
| अथणी | 70420 | 47675 |
| बैलहोंगल | 26466 | 32398 |
| बेळगाव | 27479 | 308590 |
| चिकोडी | 51367 | 130273 |
| गोकाक | 95838 | 118977 |
| हुक्केरी | 57890 | 120770 |
| खानापूर | 13180 | 434 |
| रायबाग | 57094 | 106185 |
| रामदुर्ग | 51680 | 107938 |
| सौंदत्ती | 40131 | 93415 |









