पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांची माहिती : विनाकारण फिरणाऱयांची वाहने जप्त
प्रतिनिधी/ गोडोली
लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांची वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. संबंधित वाहन लॉकडाऊन उठल्यानंतर न्यायालयाच्या निकालानंतर जबर दंड भरून सोडवावी लागणार आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱया इतरांना पेट्रोल, डिझेल भरून दिल्याने अनेकजण रस्त्यावर येत असून कोरोनाचे गांभीर्य ओळखून अशा क्षुल्लक चुका भविष्यात घातक ठरू शकतात. आता विनंती नाही, फक्त कारवाई केली जात असून रस्त्यावर येऊ नका, मोकाटांना इंधन देऊ नका, असे कळकळीचे आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना केले.
अत्यावश्यकमधील वाहनांना इंधन उपलब्ध करून दिले असताना अनेकजण आपल्या सग्यासोऱयांच्या वाहनात इंधन भरून देत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेकजण एका बाजूला कर्तव्य आणि दुसऱया बाजूला संसर्ग रोखण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत, हे दुर्दैव आहे. यामुळे अनेकजण मोकाटपणे विनाकारण रस्त्यावर येत असल्याने नाहक त्रासदायक ठरते. आता विनाकारण रस्त्यावर येणारांची विचारपूस नाही तर त्यांची वाहने जप्त करून गुन्हे दाखल केले जात आहेत.
जप्त केलेली वाहने लॉकडाऊन संपल्यानंतर न्यायालयातून कदाचित जबर दंड भरावा लागू शकतो. आता विनंती नाही, फक्त कारवाई केली जात असून विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी केले आहे. मनसेचे शहराध्यक्ष राहूल पवार म्हणाले की, कहीजण ओळखपत्र, कार्यालयाचे पत्र दाखवून इंधन भरतात. त्यावर व्यक्तीचा फोटो, गाडी नंबर आणि पेट्रोल भरल्याची नोंद असलेले कार्ड ठेवायला हवे. कोरोना विरोधात लढणाऱया योध्यांनी पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार करने, हे दुर्दैव आहे. यातून सामाजिक हानी होऊ शकते, गांभीर्य ओळखून सुचनांचे पालन करा, असे आवाहन केले आहे.








