नवी दिल्ली/प्रतिनिधी
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे डझनभर नेते दिल्ली वारी करून आले आहेत. पण यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना अमित शहांनी भेट दिली नाही. तर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. हर्षवर्धन पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजधानी नवी दिल्लीत येथे अमित शाह यांनी भेट घेतली आहे.
दरम्यान, दिल्लीला गेलेल्या या नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचे हे सर्व नेते कालच महाराष्ट्रात आले. त्यानंतर लगेचच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप ठाकरे सरकार विरोधात रणनीती आखत आहे का? त्यामुळे या दिल्ली दौऱ्यात राज्यपाल कोश्यारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोशारी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचा मुक्काम राहणार आहे. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांचा विशेष सुट देण्यात आला आहे. परंतु गेल्या आठवड्यात राज्यपाल सुटला आग लागली होती. त्यामुळे या सुटचं बरंचसं नुकसान झालं असून त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या राहण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या सुटमध्ये करण्यात आली आहे. मात्र, राज्यपाल दिल्लीत किती दिवसाच्या दौऱ्यावर आलेत याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहेत.