मुंबई-हैदराबादनंतर तिसरे मेट्रो शहर
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवलेली असताना आता दर दिवशी हे दर बहुतांश भागांमध्ये शंभरीचा आकडा ओलांडताना दिसत आहेत. मुंबई आणि हैदराबादनंतर शुक्रवारी बेंगळूर या मेट्रोसिटीमध्येही पेट्रोल दराने शंभरीपार झेप घेतली आहे. शुक्रवारी सकाळपासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर 27 पैसे तर डिझेल 28 पैसे प्रतिलिटरने महाग केले. नव्या दरवाढीमुळे आता बेंगळूरमध्ये पेट्रोल 100.17 आणि डिझेल 92.97 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
इंधन दरात होणाऱया वाढीमुळे नागरिकांचा आता प्रवासही महागण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत. शुक्रवारी नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीत, पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 96.93 आणि 87.69 रुपये प्रतिलिटर इतके असल्याचे सांगण्यात आले. तर मुंबईत पेट्रोलचे दर 103.08 रुपये आणि डिझेल 95.14 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. मे महिन्यापासून इंधन दरांमध्ये 26 वेळा वाढ झाली आहे. या दरम्यान पेट्रोलच्या दरात 5.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 6.63 रुपये प्रतिलिटर वाढ नोंद झाली आहे.









