तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
सेवानिवृत्त कर्मचार्यांना दरवर्षी आवश्यक असणारा हयातीचा दाखला देणेबाबत आता डाक विभागाने पुढाकार घेतला असून पोस्ट कर्मचारी थेट आपल्या घरी येवून हा दाखला देणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त धारकांची मोठी सोय झाली आहे. याचा लाभ सर्व सेवानिवृत्त कर्मच्यार्यांनी घ्यावा, असे आवाहन बार्शी उपविभागाचे, उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी केले आहे.
केंद्र तसेच राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचार्यांना शासनाकडून दरमहा निवृत्तवेतन (पेंशन) मिळते. दरवर्षी प्रत्येक सरकारी सेवानिवृत्त कर्मचार्यांना आपल्या हयातीचा दाखला पेंशन विभागाकडे सादर करावा लागतो अन्यथा त्या महिन्यापासून संबधितांचे निवृत्तवेतन बंद होते.
एखाद्या खाजगी सायबर कॅफे किंवा संगणक केंद्रावरून हा हयातीचा दाखला तयार करून तो संबंधीतांना देण्यासाठी आत्तापर्यंत सेवानिवृत्त कर्मचार्यांना पायपिट करावी लागत होती. परंतु, डाक विभागामुळे आता ही पायपिट थांबणार आहे. पोस्ट विभागाकडे सेवानिवृत्त कर्मचारी मागणी केल्यावर डाक कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी जावून त्यांच्या हयातीचा दाखला आधार कार्ड व बायोमेट्रिक यंत्राच्या सहायाने जागेवरच तयार करणार आहेत. त्यामुळे सध्या कोरोना काळात किंवा वयोमानांनुसार सेवानिवृत्त कर्मचार्यांना धावपळ करावी लागणार नाही. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संबंध साधावा.
बार्शी शहरात प्रवर अधीक्षक डाकघर सूर्यकांत पाठक यांचे मार्गदर्शनाखाली, बार्शीचे पोस्टमास्टर श्रीमती एम. ए. कांबळे, स.पोस्टमास्तर उल्हास सुतार, कर्मवीरनगरचे पोस्टमास्टर महेश तोष्णीवाल यांचे नियंत्रणाखाली कामकाज चालू असलेची माहिती उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात तसेच बार्शी उपविभागत असणार्या अनेक सेवानिवृत्त कर्मचार्यांना या डाक सेवेचा फायदा होणार आहे. विशेषतः वयोमान व सध्याचा कोरोना काळ या अडचणीमुळे वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मच्यार्यांना याचा लाभ होणार आहे.
पोस्ट विभागातर्फे सेवानिवृत्त कर्मच्यार्यांना हयातीचा दाखला देण्याबाबत सुविधा आपलेकडे चालू आहे. आपल्या नियमित कामाबरोबर जेष्ठ लोकांच्या तोंडावरील स्मित हास्य व त्यांचे काम झालेचे पाहून मला मानसिक समाधान व आपल्या कामाचा आनंद मिळतो.
श्रीराम बनसोडे, डाक कर्मचारी, बार्शी उपडाकघर








