ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील नागरिक वेगवेगळ्या वेबसाइट आणि अॅपसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे पासवर्ड ठेवले जातात. मात्र प्रत्येक पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण असतं. अनेक जण कंप्युटरमध्ये एक वेगळी फाईल करून त्यात पासवर्ड सेव्ह करून ठेवतात. आता लोकांची अडचण लक्षात घेऊन सरकारने सरकारी सेवांसाठी कॉमन पासवर्ड ठेवण्याची योजना आखली आहे. लवकरच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वेबासाइटसाठी वेगवेगळे यूजर नेम आणि पासवर्ड ठेवण्याची गरज नाही. एकाच लॉगिनने सर्व कामे होतील, त्याचप्रमाणे सर्व माहिती एकाच वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाइल तयार करण्यात येत आहे.
‘नॅशनल डिजिटल प्रोफाइल’मध्ये सर्व सरकारी सेवांचे एकत्रीकरण केले जाईल, ज्यामध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. प्रत्येक नागरिकासाठी वापरकर्ता प्रमाणीकरणाद्वारे लॉगिन सुरक्षित असेल. याशिवाय सर्व शासकीय कामांसाठी प्री फील्ड फॉर्मची योजना सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने एका दीर्घ सत्राचे आयोजन केले होते. या बैठकीला मंत्री आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









