पुतळे जाळून आणि चपलांचे हार घालून सामान्यांचे प्रश्न सुटतील?
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
काय चाललं आहे या सिंधुदुर्गात? कोरोनामुळे येथील तरुणांचे रोजगार गेले. शेतकरी, मच्छीमार कर्जबाजारी झालाय. पेट्रोल-डिझेल, गॅस दर आभाळाला भिडल्याने महागाईने कळस गाठलाय. विजेची बिले अव्वाच्या सव्वा येऊ लागलीत. रेशनवर धान्य मिळणं मुश्किल बनलंय. रस्ते एवढे खराब झालेत की, त्याच्यावरून चालणं जीवावर बेतणारं ठरू लागलंय. बँका सहकार्य करेनाशा झाल्यात. शासनाने गरिबांसाठी जाहीर केलेल्या योजना कागदावरच राहू लागल्यात. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि अशा या बिकट परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी आमचे नेते रस्त्यावर उतरत एकमेकांचे आय-बाप काढत पुतळे जाळतायेत. अंत्ययात्रा काढतायेत. चपलांचे हार घालतायेत. या नेत्यांना आणि त्यांच्या पालख्या घेऊन नाचणाऱया कार्यकर्त्यांना शरम वाटली पाहिजे…
खरंतर लाज वाटली पाहिजे ती हा सर्व तमाशा गप्प बसून पाहणाऱया जिल्हय़ातील सामान्य जनतेला. हे राजकारणाबरोबरच लोकशाहीचेदेखील अध:पतन नव्हे का? पाचशे-हजाराच्या लालसेपोटी आपण निवडणूक काळात विकले जाऊ लागलो तर आणखी वेगळे काय होणार? कुठल्या तोंडाने आम्ही या राजकारण्यांना जाब विचारणार? पुढच्या निवडणुका येईपर्यंत गप्प बसण्याशिवाय आपल्याकडे आहे का पर्याय?
या आंदोलनात सामान्य माणसाचे हित आहे का?
जिल्हय़ात सध्या राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली आहे. रस्त्यावर उतरून आपण निवडून दिलेल्या आजी-माजी खासदारांच्या पुतळय़ांची अंत्ययात्रा काढली जातेय. त्यांच्या प्रतिमांना चपलांचे हार घालून, लाथांनी तुडवलं जातंय. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जातेय. जणूकाही नेत्यांच्या इगोचा हा प्रश्न, पक्षातील हे हेवेदावे हाच येथील जनतेच्या जीवाभावाचा प्रश्न आहे, असा आव आणत येथील नेते कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेत, एकमेकांना आव्हाने – प्रतिआव्हाने देत आहेत, संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाचा सामान्य माणसाच्या सुख-दु:खाशी काही संबंध आहे का? मग कोणीच कसं या विरुद्ध तोंड उघडत नाही? का नाही या राजकारण्यांना आपण जाब विचारत? आणखी किती वर्षे या नेत्यांच्या ताटाखालची मांजर बनून आपण राहणार आहोत?
चिपी विमानतळाने सामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का?
आज चिपी विमानतळाचा प्रश्न मोठा केला जातोय. बंद खोलीत काय चर्चा झाली, याबाबत रान उठवलं जातंय. चिपीचा विमानतळ झाला काय आणि नाय झाला काय? विमानतळाची धावपट्टी खराब झाली काय आणि नाय झाली काय, त्याच्याशी सामान्य माणसाचा काही संबंध येतो का? बंद खोलीत कोणी कुणाला काय सांगितलं याने सामान्य माणसांचे प्रश्न सुटणार आहेत का? मग कशासाठी हे असले प्रश्न घेऊन येथील नेते आकाश-पाताळ एक करतायेत? येथील सामान्य शेतकऱयांचे अडीच कोटी रुपये परजिल्हय़ातील दूध डेरीत अडकून पडलेत. जिल्हय़ातील शेतकऱयांची घोर फसवणूक झाली. या सामान्य शेतकऱयांचा या नेत्यांना का नाही येत कळवळा? का नाही या शेतकऱयांचे पैसे वसूल करून देण्यासाठी हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत? महाराष्ट्र दिन म्हणा, स्वातंत्र्यदिन म्हणा वा प्रजासत्ताक दिन म्हणा, या दिवशी शेकडो लोक आपल्या समस्या घेऊन शासकीय कार्यालयांसमोर उपोषणासाठी बसतात. हे कशाचे द्योतक आहे? सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या नेत्यांना निवडून दिले आहे ना? मग उपोषणांची संख्या दिवसागणिक का वाढत चालली आहे? त्यांचे प्रश्न का सुटत नाहीत? आता ज्या आवेशाने ही राजकीय मंडळी रस्त्यावर उतरलीत तोच आवेश सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी का दिसत नाही? सामान्य जनतेला हा प्रश्न निश्चितच पडला असेल. पण जाब कोण विचारणार? आपण तर मतदानाचा मूलभूत हक्क पाचशे-हजारासाठी अगोदरच विकून बसलो आहोत ना?
आपण मूर्ख आहोत म्हणून आपणास मूर्ख बनवलं जातंय…
कोणी सांगेल का या नेत्यांनी जिल्हय़ात रोजगारासाठी कोणते मोठे प्रकल्प आणलेत ते? विकासाचे प्रकल्प आणलेत की जनतेचा विरोध होतो असे म्हणत खापर पुन्हा जनतेच्या माध्यावरच फोडले जाते. पण मला सांगा जिल्हय़ात येणाऱया प्रकल्पांबाबत जनतेची माथी भडकवतो कोण? हेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतेच ना? वैयक्तिक स्वार्थ आणि पक्षाचे हित राखण्यासाठी येणारे प्रकल्प मोडून काढले जातात, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, याचे खापर जनतेच्या माथी फोडले जाते. कार्यकर्त्यांना कॉन्ट्रक्ट मिळवून देणं, वाळूची टेंडर मिळवून देणं म्हणजे जनसेवा असं या नेत्यांचं म्हणणं असेल तर चाललं आहे ते ठीक आहे, असंच म्हणावं लागेल. सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी रोजगारभिमुख काहीतरी करावे लागते. आपली नेतेमंडळी काय करत आहेत? भीकमांगो आंदोलन, तिरडी आंदोलन, पुतळे दहन, एकमेकांना संपवण्याची भाषा, यातून सर्वसामान्यांना रोजगार मिळणार आहे का? कष्टकऱयांच्या पोटात दोन घास जाणार आहेत का? निवडणुका जिंकण्यासाठी 60-70 लाख सहजपणे खर्च करणारे नेते, साध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जिंकण्यासाठी 20-25 लाख सहजपणे उधळणारे नेते जेव्हा भीकमांगो आंदोलन छेडतात ते सामान्य जनतेला उल्लू बनवतात असं वाटत नाही का? खरी गडबड इथेच आहे. सामान्य माणसासाठी यांचं आंदोलन नाहीच मुळी. पण आव आणला जातोय सामान्य माणसासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोत असा. सर्व सामान्याला हे सर्व समजतंय, उमजतंय. पण करणार काय? आपण तर पाचशे-हजाराला आपला मूलभूत अधिकार विकून बसलोय. ही स्वत:हून स्वत:ची चालविलेली क्रूर चेष्टा नव्हे का? यात या नेत्यांची चूक आहेच कुठे? आपण मूर्ख आहोत म्हणून ही मंडळी आपणास मूर्ख बनवतात. आपण विकले जातो म्हणून ही मंडळी आपणास विकत घेतायेत.
आपणास स्वारस्य केवळ गॉसिपमध्येच
आपल्या देशात म्हणा वा राज्यात, समाज जेव्हा अस्वस्थ असतो तेव्हा अशी काहीतरी गॉसिप सोडायची की, ज्यामुळे सामान्य जनतेचा मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होतो. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत थेट हाच फॉर्म्युला सर्रासपणे वापरला जातोय. काही वर्षांपूर्वी कुणीतरी गणपती दूध पितो, असे सांगितल्यावर लोकांच्या रांगाच्या रांगा देवळासमोर गणपतीला दूध पाजण्यासाठी लागल्या. कुठल्या तरी कुशिऱयाच्या वैद्याने सांगितले की, तुमच्या डोळय़ात थेंब घालतो आणि तुम्हाला नजर आणून देतो. लागल्या त्याच्या दारात रांगाच रांगा. सध्याची ही आंदोलने गणपतीला दूध आणि कुशिऱयाच्या वैद्यांचे थेंब याच प्रकारातील आहेत. ते आपणास मूर्ख बनवतायेत आणि आपण मूर्ख बनतोय. हे लोकशाहीचे अध:पतन नव्हे काय? सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, त्याला आरोग्य सेवा मिळत नाहीत, त्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, त्याला बँका दारात उभा करत नाहीत, त्याला रस्ता नाही मिळत, साकव नाही मिळत, साधी मोबाईल रेंज नाही मिळत. याबाबत आमदार, खासदारांना खडसावून जाब विचारण्याऐवजी आपणास इंटरेस्ट खासदारांनी भजनात पेटी कशी वाजवली? त्यांच्या घरी भजनाचे किती मेळ आले? दादांच्या शब्दाला अमित शहांनी कसा मान दिला? आमदारांनी सायकल कशी चालवली? माजी खासदारांनी शिव्या कशा दिल्या यातच! आपणच आपला स्वाभिमान गमावून बसल्याने आणखी काय अपेक्षा धरायची?
हो! कारण आपण विकलो गेलोत!!
जोपर्यंत राजकारण लोकशाहीच्या देव्हाऱयात होते तोपर्यंत सामान्य माणूस त्याच्या समोर नतमस्तक व्हायचा. आता राजकारण देव्हाऱयातून रस्त्यावर पोहोचलंय. त्यामुळे त्याची किंमत पुरती धुळीस मिळालीय. नाथ पै, दंडवतेंची नावे घेताच अजूनही लोक नतमस्तक होतात. या लोकांकडे संपत्ती काय होती तर राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर या लोकांची घरं नोटांच्या बंडलाऐवजी पुस्तकांनी भरलेली आढळून आली. या नेत्यांच्या साधेपणातील मोठेपणा आपण अलिकडे विसरत चाललो आहोत. हा समाजाचा फार मोठा तोटा आहे. हे राजकारणाबरोबरच समाजाचे आणि लोकशाहीचे अध:पतन आहे. पण दुर्देव अस्ं आहे की, याबाबत कुणालाच काही वाटत नाही आहे.









