प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना आता महापालिकेकडून व्यवसाय ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून मनपा क्षेत्रातील फेरीवाल्यांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
याबाबत आयुक्त कापडणीस पुढे म्हणाले की, राष्ट्रीय पथविक्रेता धोरणानुसार महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे पथविक्रेता सर्व्हेक्षण सुरू आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व फेरीवाल्यांना पथविक्रेता ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मनपाक्षेत्रातील फेरीवाल्यानी विहित कालावधीत आपले अर्ज मनपाकडे सादर करायचे आहेत. यासाठी मनपाकडून गुरुवार दि.१० डिसेंबर २०२० पासून अर्ज देणेची आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तर जमा झालेल्या अर्जानुसार २२ डिसेंबर २०२० पासून फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या फेरीवाल्यांना नोंदणी शुल्क १०० रुपये, घनकचरा उपयोगकर्ता शुल्क ६०० (डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ प्रतिमाह रु.१५० प्रमाणे) तसेच ३०० रुपये परिरक्षण शुल्क (डिसेंबर २०२० करिता) यानंतर प्रतिमाह ३०० रुपये परिरक्षण शुल्क असे एकूण ९०० रुपये फेरीवाल्यांना अर्जासोबत भरावे लागणार आहेत.
ज्या फेरीवाल्यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज सादर केला आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मनपाक्षेत्राबाहेरून जे फेरीवाले मनपाक्षेत्रात येऊन व्यवसाय / विविध वस्तूंची विक्री करणार आहेत अशांना सुद्धा फेरीवाला नोंदणी बंधनकारक राहणार असल्याचेही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.