बेळगाव / प्रतिनिधी :
जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. गुरुवारी जिल्हा प्रशासन, आरोग्य खाते, परिवहन मंडळातर्फे शहरासह ग्रामीण भागात रुग्णांच्या सेवेसाठी मोबाईल फिव्हर क्लिनिक बस धावणार आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहरासह ग्रामीण भागात सर्रास खासगी दवाखाने बंद आहेत. नागरिकांना वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे वैद्यकीय सेवेपासून नागरिकांना लांब राहावे लागत आहे. अशा संकट काळात ही मोबाईल फिव्हर क्लिनिक बस सोयीस्कर ठरणार आहे. शहरात एक, ग्रामीण भागात एक तर चिकोडी भागात एक अशा एकूण तीन बस शुक्रवारपासून धावणार आहेत. गुरुवारी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री जगदीश शेट्टर, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह इतर प्रतिनिधींच्या उपस्थितीत या बसना चालना देण्यात आली. परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते विश्वेश्वरय्यानगर येथील स्मार्ट कमांडंट कंट्रोल सेंटरकडे या तीन बस सुपूर्द करण्यात आल्या.
कोरोनाच्या धास्तीने ग्रामीण भागात खासगी क्लिनिक उघडली जात नाहीत. त्यामुळे नागरिकांची उपचारासाठी धावाधाव सुरू आहे. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांची वेळेत उपचाराअभावी गैरसोय होत आहे. याची दखल घेत जिल्हा प्रशासने ही क्लिनिक बस सुरू केली आहे.
परिवहन मंडळाच्या हुबळी येथील कार्यशाळेत जुन्या बसमधील खुर्च्या काढून त्या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी एक बेड, दोन टेबल, पाण्याची टाकी व औषधाचा बॉक्स बसविण्यात आला आहे. त्याबरोबर रुग्णांवर उपचार करण्यासाठी बसमध्ये एक डॉक्टर, एक नर्स व औषधे उपलब्ध करण्यात येणार आहेत. शहरासह ग्रामीण भागात धावणाऱया या बसमध्ये ताप, सर्दी, खोकला, दमा अशा रुग्णांवर उपचार केले जाणार असून बसमध्ये काम करणाऱयांना सॅनिटायझर, पीपीई किट पुरविली जाणार आहे. विशेषकरून बसच्या बाहेरच्या बाजूला हात धुण्यासाठी वाश बेसिन बसविण्यात आली आहे. नागरिकांनी 104 किंवा 1077 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास बस उपलब्ध होणार आहे.









