पासपोर्ट सेवा केंद्राने वाढविली मर्यादा : सर्वसामान्यांना पासपोर्ट काढणे आणखी झाले सोयीचे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळेच आता बेळगाव जिल्हय़ातील नागरिकांसाठी पासपोर्ट काढणाऱयांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आता दररोज 40 जणांना पासपोर्टसाठी कागदपत्रांची तपासणी करता येत आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच पासपोर्ट नागरिकांना मिळणार आहे.
बेळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयात पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र आहे. कोरोनामध्ये पासपोर्ट सेवा केंद्र बंद करण्यात आले होते. यामुळे विदेशामध्ये जाणाऱया प्रवाशांचे हाल होत होते. बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर 28 सप्टेंबरपासून पुन्हा पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यावेळी दिवसाला केवळ 25 जणांनाच पासपोर्ट काढण्याची परवानगी देण्यात आली होती.
कर्नाटकात बेळगावसह 22 ठिकाणी पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट काढण्याची प्रकिया राबविली जात आहे. कोरोनामुळे काही मोजक्मयाच व्यक्तींना प्रवेश देण्यात येत होता. गर्दी टाळण्यासाठी बेळगाव कार्यालयात केवळ 25 नागरिकांनाच अपॉईंटमेंट देण्यात येत होती. आता दररोज 40 जणांना अपॉईंटमेंट देण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे पासपोर्ट काढणे आणखी सोयीचे होणार आहे.









