मुंबई/प्रतिनिधी
केंद्राने खतांच्या किंमती वाढविल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायने व खतमंत्री सदानंद गौडा यांना पत्र पाठवून खतांच्या किंमती कमी करण्यास सांगितले होते. त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खत दरवाढीचा निर्णय घेतला आहे. आता ठाकरे सरकारनेही शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच तब्बल १४,७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने सरकारचे आभार मानले आहेत.
केशव उपाध्ये यांनी, “केंद्राने देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेअंतर्गत २० हजार ६६७ कोटींचा निधी जमा केला, त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. आता खतांच्या दरवाढीचा बोजा केंद्राने उचलून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भार हलका केला. त्यामुळे आता राज्याने १० हजार रूपये अनुदान दिले पाहिजे”.
केंद्र सरकारने खतावरील (डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले आहे. परिणामी खतांच्या जागतिक किमतीत फार मोठी वाढ झालेली असतानाही शेतकऱ्यांना ती जुन्या दरानेच उपलब्ध होणार आहे. यामुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, तो केंद्र सरकारलाच पेलावा लागणार आहे.