ऑनलाइन टीम / मुंबई :
शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपद न मिळाल्याने आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असला तरी विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष मात्र लगेचच सक्रिय झाला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘आज अशा बऱयाच बातम्या मिळतील.’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. ही पहिलीच बातमी आहे. अशा अनेक बातम्या आता येतील, असं ते म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला आहे. अर्जुन खोतकर यांनी सत्तारांशी चर्चाही केली आहे. अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देताना मला याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले आहे.