वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निर्भया बलात्कार व हत्याप्रकरणातील आरोपी विनय शर्मा याची दया याचिका फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी अक्षयसिंह ठाकूर याने शनिवारी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. विनय याच्याआधी मुकेश याची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली असून अद्याप पवन गुप्ता याने याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे निर्भयातील दोषींची फाशी अद्यापही निश्चित होऊ शकलेली नाही.
दरम्यान, तिहार कारागृह प्रशासनाने डेथवॉरंटला आव्हान दिले असून पटियाला हाऊस कोर्टाशी संपर्क साधून चारही दोषींच्या फाशीच्या तारीख निश्चित करण्याबाबत मागणी केली आहे. गुरुवारी अक्षयसिंह याची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर त्याच्याकडे केवळ राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवण्याचाच मार्ग शिल्लक आहे.
पटियाला हाऊस कोर्टामध्ये तिहार कारागृहाच्यावतीने इरफान अहमद यांनी बाजू मांडली. विनय शर्माची याचिका शिल्लक असली तरीही उर्वरित तिनही आरोपींना फाशी देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. यावर लगेचच सुनावणी घेण्याचे ठरवण्यात आले आहे. दरम्यान, निर्भयाच्या आईने मात्र यावर नापसंती व्यक्त केली आहे. दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी दोषींना कधीच फाशी होणार नाही, असा दावा केला आहे. मात्र मी माझी लढाई सुरुच ठेवेन. दोषींना फाशी देण्याचा निर्णय सरकारला घ्याव्याच लागेल, असे त्या म्हणाल्या.









