ऑनलाईन टीम / नवी मुंबई
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची गर्दी ठरलेली असायची. मात्र यापूढे हे चित्र दुर्मीळ होणार आहे. कारण गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून एका मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेसाठी गर्दी करायला लागू नये. यातुन प्रवेश केंद्रांवर गर्दी टाळली जाईल.कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी POEAM या मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
विद्यार्थी आता POEAM अॅपच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवर हे अॅप उपलब्ध होणार असल्याची माहिती अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही दिली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया पहिली यादी शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी जाहीर झाली असून या फेरीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे.
केंद्रीय प्रवेशासाठी एकूण १ लाख ९७ हजार १७१ जागांसाठी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत समावेश झाला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. तर १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि १२ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या पसंती क्रमापासून खालील पसंती क्रमाची महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे संबधित वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या अॅपमुळे प्रवेश प्रक्रिया सुलभ होणार असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठीचे हेलपाटे ही वाचणार आहेत.
येथे क्लिक करत डाउनलोड करा अॅप








