आतापर्यंत कोरोनामुळे 9 मुलांचा मृत्यू : राज्यभरात एकूण 22,371 मुलांना बाधा : मृत्यू झालेल्या मुलांना होते अन्य आजार, डॉ. शेखर साळकर यांनी दिली माहिती
आतापर्यंत बाधित झालेली मुले
- एक ते पाच वर्षे – 4804
- सहा ते दहा वर्षे – 5425
- अकरा ते पंधरा वर्षे – 6830
- सोळा ते अठरा वर्षे – 5312
प्रतिनिधी /पणजी
शाळा बंद असताना कोरोना महामारीच्या गेल्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राज्यातील एकूण 22371 शालेय मुलांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यातील 9 मुले कोरोनाची बळी ठरली अशी माहिती कोरोना व्यवस्थापन तज्ञ समितीचे प्रमुख सदस्य असलेले डॉ. शेखर साळकर यांनी दिली आहे. बळी पडलेल्या 9 मुलांना इतर विविध प्रकारचे आजार असल्यामुळे प्राण गमवावे लागले, असा दावा त्यांनी केला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 5 जणांचा तर दुसऱया लाटेत 4 मुलांचा अंत झाला. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा संभव आहे परंतु ती धोकादायक असणार नाही असे भाकीत डॉ. साळकर यांनी केले आहे.
योग्य ती एसओपी आखण्याची गरज
आठवी ते बारावी इयत्तेच्या शाळा हळूहळू सुरु करण्यास हरकत नाही. त्यासाठी योग्य ती एसओपी आखावी अशी शिफारसही त्यांनी केली आहे. ज्या मुलांना विविध प्रकारचे आजार आहेत त्यांनी डॉक्टर्सचे प्रमाणपत्र आणावे आणि त्या आधाराने त्यांना वर्गात बसता येईल. सरकारने त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. साळकर यांनी नमूद केले.
आतापर्यंत मिळून कोरोनाबाधित झालेली मुले ही 1 ते 18 वर्षे या वयोगटातील आहेत. एक ते पाच वर्षे – 4804, सहा ते दहा वर्षे – 5425, अकरा ते पंधरा वर्षे – 6830 आणि सोळा ते अठरा वर्षे – 5312 अशी मुले वयोगटातील वर्गवारीप्रमाणे कोरोनाबाधित झाली आहेत. त्यातील 9 मुलांचा कोरोनाने बळी घेतला तर उर्वरित मुले त्यातून बरी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गोव्यातील 60 ते 70 टक्के जनता कोरोनाचे दोन डोस घेतल्यामुळे आता गोव्यात तसा धोका कमी आहे. ज्या मुलांना इंटरनेट – मोबाईल नेटवर्क चांगले मिळते त्यांनी ऑनलाईन शिकवणी करण्यास हरकत नाही, असे समितीचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे तिघांचा बळी : दिवसभरात 84 नवीन कोरोनाबाधित
गेल्या 24 तासात म्हणजे शुक्रवारी 3 कोरोना बळींची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 3317 वर पोहोचली आहे. दिवसभरात नव्याने 84 कोरोनाबाधित सापडले तर 99 जण बरे झाले. शिवाय 18 जणांना हॉस्पिटलात भरती करावे लागले तर 7 जणांना हॉस्पिटलातून घरी पाठवण्यात आले आणि 66 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 838 झाली असून विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मिळून एकूण 176515 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 172360 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे ः डिचोली – 28, सांखळी – 13, पेडणे – 26, वाळपई – 19, म्हापसा – 25, पणजी – 62, हळदोणा – 22, बेतकी – 20, कांदोळी – 46, कासारवर्णे – 6, कोलवाळ – 25, खोर्ली – 17, चिंबल – 23, शिवोली – 34, पर्वरी – 35, मये – 8, कुडचडे – 19, कोणकोण – 35, मडगांव – 110, वास्को – 27, बाळ्ळी – 23, कासावली – 17, चिंचिणी – 21, कुठ्ठाळी – 38, कुडतरी – 27, लोटली – 10, मडकई – 4, केपे – 25, सांगे – 4, शिरोडा – 5, धारबांदोडा – 2, फोंडा – 47, नावेली – 15. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी – जास्त होत असून मृत्यूचे सत्रही कायम आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.